दोघेही पायी पोहचले वडवणीत
बीड । वार्ताहर
प्राणघातक हल्ला प्रकरणात अटक केलेल्या दोन आरोपींची कोरोना तपासणी करण्यापूर्वीच त्यांनी जिल्हा रुग्णालयातून पळ काढला होता. मंगळवारी रात्री वडवणी पोलिस व एलसीबी कर्मचार्यांनी वडवणीतून एकाला ताब्यात घेतले दुसरा आरोपी अजून फरार आहे. महत्वाचे हे की, या दोन्ही आरोपींनी बीडमधून पोलिसांच्या तावडीतून सुटल्यानंतर पायी वडवणी गाठली होती. मध्यरात्रीच लपत छपत ते वडवणीला गेले. तिथे एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरी थांबले होते.
सिरसाळा येथे नवाज खान आयुब खान यांच्यावर दुचाकी न दिल्याच्या कारणावरुन हल्ला केला गेला होता. या प्रकरणात इरफान शेख बिबन शेख आणि आसेफ गफार बागवान या दोघांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. दोघांना सिरसाळा पोलिसांनी अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. त्यांना बीडच्या कारागृहात दाखल करण्यासाठी दोन पोलिस कर्मचारी घेऊन आले होते. मात्र, कोरोनाच्या अनुषंगाने येणार्या प्रत्येक कैद्याची कोरोना तपासणी करुनच त्याला कारागृहात प्रवेश द्यावा अशा सूचना असल्याने कारागृह प्रशासनाने पोलिसांना या दोन्ही आरोपींची कोरोना चाचणी तपासणी करुन घेऊन या असे सांगितले होते. त्यावरुन दोघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.
जवळ कुणी नसल्याचा फायदा घेत त्यांनी रुग्णालयातून पळ काढला होता. दरम्यान, सोमवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेला बीडच्या गांधीनगर भागात लपल्याची माहिती मिळाली. त्यावरुन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता एका घरात लपलेल्या दोघांनी तिथून पळ काढला. पोलिसांनी सिनेस्टाईल त्यांचा पाठलाग गेला यात एक पोलिस कर्मचारीही जखमी झाला होता तर दोन्ही आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले होते.मंगळवारी रात्री दोघांपैकी आसेफ गफार बागवान हा वडवणी येथे एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरी असल्याची माहिती मिळाल्यावरुन वडवणी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला पकडले. तर इरफान शेख फरार आहे.
Leave a comment