सहा मालवाहू ट्रकही जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई
काळ्या बाजारात जाणारे धान्य रोखले
गोदाम मालक अरूण मस्के विरूध्द गुन्हा
गेवराई । मधूकर तौर
धान्य दुकानाच्या माध्यमातून गोरगरिबांना वाटपासाठी पाठवलेल्या तब्बल पावणे दहा लाख रूपयाच्या तांदळाचा गोदामात साठा केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री गेवराईत उघडकीस आला. गुन्हे शाखेच्या पथकाने लॉकडाऊनच्या काळात केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे. महत्वाचे हे की, याच गोदाम परिसरातून तब्बल 60 लाख रूपये किंमतीचे पाच मालवाहू ट्रकही जप्त करण्यात आले. शहरालगतच्या पांढरवाडी रस्त्यावरील खासगी गोदामात मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. रेशनचा काळाबाजार करणार्यांमध्ये या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली. सर्वसामांन्यामध्ये मात्र पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले जात आहे.
अरूण अशोक मस्के असे गुन्हा दाखल झालेल्या गोदाममालकाचे नाव आहे. गेवराई शहरातील पांढरवाडी रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाच्या पाठीमागील खाजगी गोदामामध्ये रेशनचा गहु, तांदूळ आणि साखरेचा अवैध साठा केला असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांना मिळाली होती. नंतर अधिक्षकांनी गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला संबंधीत ठिकाणी कारवाईच्या सुचना दिल्या. या पथकाने रात्री 11 च्या सुमारास गोदामात छापा मारला असता तिथे गहु, तांदूळ व साखरेचा तब्बल 9 लाख 74 हजार 950 रूपयांचा अवैध साठा आढळून आला. या गोदामाच्या बाहेर सहा मोठे ट्रक उभे होते. प्रत्येक ट्रकच्या पुढील काचेवर ‘लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था सुधारित धान्य वितरण व्यवस्थापन पध्दत महाराष्ट्र शासन’ अशा प्रकारचे स्टिकर लावलेले होते. त्यावरून हे सर्व ट्रक या गोदामातील अन्नधान्याची अवैधरित्या वाहतूक करण्यासाठी वापरत असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी गेवराई महसूलचे नायब तहसिलदार अशोक भंडारी यांच्या फिर्यादीवरून गोदाम मालक अरूण अशोक मस्के याच्याविरूध्द गेवराई ठाण्यात कलम 3,7 अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 नूसार गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईत 9 लाख 74 हजार 950 रूपयांचे अन्नधान्य व 60 लाख रूपयांचे सहा ट्रक असा 79 लाख 74 हजार 950 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हे सर्व अन्नधान्य शासकीय वितरण प्रणालीद्वारे स्वस्त धान्य दुकानदारांना शिधापत्रिका धारकांसाठी वाटप करण्यासाठीचे अन्नधान्य असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी अरूण मस्के फरार असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत. गेवराईचे निरीक्षक पुरूषोत्तम चोभे या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही मोठी कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक स्वप्नील राठोड, गुन्हे शाखा निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक आनंद कांगुणे, पो.ना.झुंबर गर्जे, सखाराम पवार, पोकॉ.गोविंद काळे, चालक पोना.गहिनीनाथ गर्जे यांनी केली.
50 किलो वजनी 665 गोण्यांसह 2692 रिकामे पोते
पोलिसांनी गोदामात छापा मारला तेव्हा गव्हाच्या 50 किलो वजनाच्या 462 गोण्या, तांदळाच्या 50 किलो वजनी 191 गोण्या व साखरेच्या 50 किलो वजनी 12 गोण्या असा माल मिळून आला. शिवाय या गोदामात ज्युट प्रकारच्या महाराष्ट्र शासन असे नाव असलेल्या व स्वच्छ भारत असे छापलेल्या मोकळ्या 383 गोण्या तसेच गर्व्हरमेंट ऑफ पंजाब असे नाव छापलेल्या 1509 मोकळ्या गोण्या, भारतीय खाद्य नियम छपाई असलेल्या 50 मोकळ्या गोण्या तसेच एसजीएसटी मध्यप्रदेश असे छापलेल्या 50 गोण्या व इतर 50 मोकळ्या गोण्या अशा एकूण 2042 मोकळ्या गोण्या त्याचबरोबर गर्व्हरमेंट ऑफ पंजाब असे छापलेल्या एकूण 650 पांढर्या रंगाच्या मोकळ्या गोण्या सापडल्या.
वाढीव दराने विक्री करण्यासाठीचे नियोजन
पोलिसांनी गोदामाची पाहणी केली तेव्हा गंभीर बाब समोर आली. या गोदामात अवैध साठा करून ठेवलेले अन्नधान्य शासकीय गोण्यांमधून काढून ते पांढर्या रंगाच्या गोण्यांमध्ये भरून त्याची काळ्या बाजारात वाढीव दराने विक्री करण्यासाठीचे नियोजन केल्याचे निदर्शनास आले. दरम्यान अन्नधान्याच्या तपासणीसाठी गेवराईच्या पुरवठा अधिकार्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पंचनामा केला तेव्हा हा संपूर्ण माल काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी साठा करून ठेवल्याचे निष्पन्न झाले.
Leave a comment