बीड | वार्ताहर
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून मंगळवारी (दि.5) सकाळी नऊ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते, सायंकाळी रिपोर्ट प्राप्त झाले, सर्व रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.आता आजपर्यंत तपासलेले 210 जणांचे 224 स्वॅब अहवाल कोरोना निगेटिव्ह ठरले असून बीड जिल्ह्याचा ऑरेंजमधून ग्रीन झोनमध्ये पोहचण्याचा मार्ग सुलभ झाला आहे.
बीड जिल्ह्यात सध्या कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही.आष्टी तालुक्यातील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच्यावर नगर येथे उपचार करण्यात आले. त्या रुग्णाने कोरोनाशी यशस्वी लढा दिला. त्यानंतर त्याचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले त्यामुळे आता संबंधित व्यक्ती मूळगावी परतला आहे. या रुग्णाचा गृह विलगीकरणाचा चौदा दिवसांचा कालावधी मंगळवारी पूर्ण झाला आहे.
मंगळवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात 9 जणांचे स्वॅब प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.हे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. थोरात यांनी दिली.जिल्हा प्रशासन कोरोना प्रतिबंधात्मक आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहनही वारंवार केले जात आहे.
Leave a comment