आजपर्यंत तपासलेले 201 जणांचे 215 स्वॅब अहवाल कोरोना निगेटिव्ह
बीड । वार्ताहर
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून आज मंगळवारी (दि.5) सकाळी नऊ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी ही माहिती दिली. दरम्यान आजपर्यंत तपासलेले 201 जणांचे 215 स्वॅब अहवाल कोरोना निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्याला मोठा दिलासा मिळालेला आहे.
बीड जिल्ह्यात सध्या कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. आष्टी तालुक्यातील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच्यावर नगर येथे उपचार करण्यात आले. त्या रुग्णाने कोरोनाशी यशस्वी लढा दिला. त्यानंतर त्याचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले त्यामुळे आता संबंधित व्यक्ती मूळगावी परतला आहे. या रुग्णाचा गृह विलगीकरणाचा चौदा दिवसांचा कालावधी आज मंगळवारी पूर्ण होत आहे. त्यामुळे बीड जिल्हा ऑरेंजमधून ग्रीन झोनमध्ये येण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे.
दुसरीकडे बीड जिल्ह्यात आजपर्यंत 201 संशयितांचे तपासलेले 215 स्वॅब अहवाल हे निगेटिव्ह आलेले आहेत. बीड जिल्हा रुग्णालयासह अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात लक्षणे जाणवणाऱ्या संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जात आहेत. अंबाजोगाईचे स्वॅब नमुने लातूरला तर बीड जिल्हा रुग्णालयातील स्वॅब औरंगाबादच्या प्रयोगशाळेत तपासले जातात. मंगळवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात 9 जणांचे स्वॅब प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. सायंकाळपर्यंत त्याचा रिपोर्ट प्राप्त होईल अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. थोरात यांनी दिली. सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 39 हजाराहून अधिक मजुरांनी जिल्ह्यात प्रवेश केला आहे. जिल्हा प्रशासन कोरोनाप्रतिबंधात्मक आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहनही वारंवार केले जात आहे.
Leave a comment