आष्टी । वार्ताहर
आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील ग्रामपंचायतने गावाला अल्पदरात शुद्ध पाणी पुरवठा करणारे पाण्याचे एटीएम गावातील वाईट प्रवृत्तीच्या अज्ञात लोकांनी दगड घालुन फोडले आहे त्यामुळे ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावे लागणार आहे. या नुकसानीबाबत ग्रामपंचायतीने आष्टी पोलीसांत तक्रार दाखल केली आहे.
गावातील प्रत्येक गोरगरिब नागरीकास फिल्टरचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी टाकळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ निशाताई सावता ससाणे यांनी हजारों रुपये खर्च करुन आरओ एटीएम बसविले होते. गतवर्षी प्रचंड उन्हाळा असतानाही उत्कृष्ट नियोजनामुळे गावात टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली नाही. ग्रामपंचायतीने कडा-मिरजगाव रस्त्यालगत गावात नदीजवळ आर ओ एटीएम बसविले आहे. दिनांक 3 मे 2020 रोजी सायंकाळच्या वेळी ग्रामपंचायत मालकीचे आरो वॉटर एटीएम वरती अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक दगडाने मारून नुकसान केलेले आहे. तसेच आरओ वॉटर सिस्टीम असलेल्या रूमचे शटरवर देखील दगड मारुन त्याचे नुकसान केले आहे. या प्रकारामुळे गावातील शुद्ध पाण्याचा पुरवठा बंद झालेला असून ग्रामपंचायत तथा गावाची मालमत्ता धोक्यात आली आहे. संबंधित लोकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी केली आहे.
Leave a comment