क्षीरसागरांना पुन्हा नगर पालिका लढवायची आहे की नाही?
बीड । वार्ताहर
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नगर पालिका प्रशासनाला असे काय अधिकार दिले आहेत? की ज्यामुळे नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टेंसह त्यांचे इतर बगलबच्चे कर्मचारी शहरात आलेल्या भाजी विक्रेत्या शेतकर्यांना विनाकारण रझाकारी त्रास देत आहेत. गेल्या आठवभरापासून हा प्रकार सुरूच असून त्यांना साधी कोणी समज देखील दिली नाही. वर्तमानपत्रामध्ये बातम्या येवून देखील कोणत्याही लोकप्रतिनिधींनी देखील या अधिकारी आणि कर्मचार्यांना समजावले नाही. त्यामुळे शनिवारी संचारबंदी शिथील झाल्यानंतर नगर पालिकेच्या कर्मचार्यांनी विनाकारण खेड्यातून आलेल्या भाजीविक्रेत्यांना पास नसल्याच्या कारणावरून अरेरावी करत त्यांच्याजवळील भाज्या पून्हा नालीत फेकून दिल्या. प्रशासनातील अधिकारी येतील आणि जातील मात्र इथे कारभार करणार्या नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी देखील नगर पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचार्यांना समजून सांगणे आवश्यक होते. केवळ भाजीविक्रेत्यांनाच नव्हे तर शहरातील लहान लहान किराणा दुकानदार, फळविक्रेते व इतर व्यापार्यांना देखील न.प.कर्मचार्यांनी हैराण करून सोडले आहे. त्यामुळे दोन्ही क्षीरसागरांना पुन्हा निवडणूक लढवायची नाही काय? असा सवाल व्यापारी वर्गातून केला जात आहे. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर आणि उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी याची दखल घ्यायला हवी. परंतू दोघांनीही या संदर्भात एकाही व्यापार्याला फोन केला नाही अथवा दखल घेतली नाही. त्यामुळे शहरात नाराजी व्यक्त केली जात आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार शहरामध्ये रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी नगरपालिका प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचार्यांना सुचना दिल्या. त्याचा अर्थ मुख्याधिकारी डॉ.गुट्टे यांनी असा घेतला की जणूकाही ते बीड शहराचे जिल्हाधिकारीच झाले. सुरूवातीला एका औषधी विक्रेत्याला काठीने झोडपले. त्यामध्ये गुन्हाही दाखल झाला. त्यानंतर भाजीविक्रेत्यांना परवाना देण्याची प्रक्रिया सुरू झाली, त्यातही ग्रामीण भागातील भाजीपाला उत्पादक शेतकरी, विक्रेते यांची अडवणूक केली गेली. ज्यांना पास मिळाला त्यांनी रस्त्यावर गाडा लावला. त्यामुळे देखील नगर पालिकेचे कर्मचार्यांनी या शेतकर्यांकडून, भाजीपाला विक्रेत्यांकडून हजार पाचशेचे दंड वसूल केले. त्यातच संचारबंदी शिथील असलेल्या दोन तासात दुकान उघडे असले की, व्यापार्यांना मास्क न लावणे, सोशल डिस्टंस न पाळणे आदि कारणावरून हजार पाचशेचे दंड लावले. या कर्मचारी आणि अधिकार्यांची भाषा ही निव्वळ अरेरावीचीच आहे. पोलिसांप्रमाणेच हातात काठ्या घेवून हे कर्मचारी फिरत आहेत. कोरोना कायम राहणार नाही, अधिकारी देखील कायम राहणार नाही, पण येथील कर्मचारी इथेच राहणार आहेत. निदान याचा विचार तरी या कर्मचार्यांनी करायला हवा. भाजी विकणारे शेतकरी काय आभाळातून पडले नाहीत. तेही आपल्यापैकीच कोणीतरी आहेत. याची जाणीव अधिकार मिळालेल्या कर्मचार्यांनी ठेवायला हवी होती. गेल्या दोन आठवड्यापासून नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.गुट्टे आणि कर्मचार्यांनी शहरामध्ये जो तमाशा लावला आहे. तो तमाशा नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, आ.संदिप क्षीरसागर यांनी निमुटपणे पहावा याचेदेखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे. क्षीरसागर कुटूंबियांना पून्हा नगरपालिकेची निवडणूक लढवायची नाही काय? त्यामुळेच ते शांत असावेत अशा संतप्त भावना व्यापारी, शहरवासियांमधून व्यक्त केले जात आहे. आतातरी लॉकडाऊन वाढल्यानंतर पून्हा असा प्रकार घडणार नाही. याची खबरदारी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी घ्यावी अशीही मागणी होत आहे.
Leave a comment