जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश
बीड । वार्ताहर
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून बीड जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग 2 व दुय्यम निबंधक श्रेणी 1 या कार्यालयामध्ये होणारे दस्तनोंदणी व्यवहार येत्या 5 मे पासून अटी व शर्तींच्या आधारे सुरू करण्यास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी परवानगी दिली आहे.
दस्तनोंदणी व्यवहार करत असताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही या अनुषंगाने बायोमेट्रीक प्रणालीचा वापर करावा तसेच भारत सरकार, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणार्या सुचनांचे पालन करणे, या सर्व कार्यालयांना बंधनकारक राहिल, तसेच कार्यालय सुरू करण्याच्या दिवशी व नंतर दररोज संपुर्ण कार्यालयाचे निर्जतुंकीकरण करावे असे आदेशही देण्यात आले आहे. तसेच या कार्यालयातील कर्मचार्यांना मास्क, स्वच्छ रूमाल, सॅनिटायजर, कागद, कापूस इत्यादी साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावे. पटाचा दरवाजाच्या दोन्ही बाजुंचा भाग, दरवाजांचे हँडल्स, नोब्स, टेबल-खुर्ची हे दर तासाला निर्जंतुकीकरण करत रहावे. तसेच अधिकारी, कर्मचार्यांनी नियमितपणे सॅनिटायजरचा वापर करून साबणाने हात स्वच्छ धुवावेत. कार्यालयात येणार्या नागरिकांना बायोमॅट्रीकचा वापर करण्यापुर्वी व वापर केल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुण्यासाठी प्रेरीत करावे असे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. दस्तनोंदणी कार्यालयाने एका नोंदणीसाठी 60 वर्षांवरील आणि 20 वर्षांखालील नागरीकांनी व्यवहारांसाठी शक्यतो नोंदणी कार्यालयात लॉकडाऊन संपेपर्यंत भेट देवुनही यासह या कार्यालयांना व नागरिकांसाठी 58 सूचना देण्यात आल्या आहेत.
तिघांनाच कार्यालयात बोलवा
दस्तनोंदणीसाठी येणार्या नागरिकांना कुटूंबातील सदस्यांसह किंवा मित्रांसह समुदायाने दस्तनोंदणीसाठी न येता केवळ लिहून घेणार, लिहून देणार व्यक्ती आणि साक्षीदार एवढयाच लोकांनी दस्त नोंदणीसाठी कार्यालयात येणे आवश्यक आहे. तशा सूचनाही या कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. तसेच या कार्यालयातील दोन कक्षामधील व टेबलांमधील अंतर किमान 2 मिटर ठेवण्याचेही कळविण्यात आले आहे.
Leave a comment