अभिलेखे नसताना 14.80 कोटींची देयके ऑनलाईन केली
बीड । वार्ताहर
पंचायत समितीमध्ये नरेगाच्या कामांचा बोगस वर्क कोड काढणे, जिओ टॅग करणे तसेच 14.80 कोटीची देयके अभिलेखे नसताना ऑनलाईन केल्याप्रकरणी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी तांत्रिक सहाय्यक, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी व एका ऑपरेटरची थेट सेवा समाप्त करत या तिघांविरुध्दही गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याबरोबरच बीडच्या गटविकास अधिकार्यांचीही विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याचे आदेश दिले आहेत.
ऑपरेटर बंडू राठोड, तांत्रिक सहाय्यक आबूज, सहायक कार्यक्रम अधिकारी शाम पंडित अशी सेवा समाप्त केलेल्यांची नावे आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत सन 2017-18 तत्पूर्वी मंजूर कामे ज्यावर शून्य खर्च असताना व नवीन कामाचे संकेताक क्रमांक तयार करुन या कामावर बोगस हजेरी पत्रके निर्गमित करत अनियमितता केल्या प्रकरणी ही कारवाई झाली आहे.
याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर नरेगाच्या गटविकास अधिकार्यांना विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश सीईओ अजित कुंभार यांनी दिले होते. नंतर झालेल्या चौकशीत पंचायत समितीमध्ये नरेगाच्या कामात अनियमितता, बोगस वर्क कोड काढणे, जिओ टॅग करणे यासह गटविकास अधिकार्यांना अंधारात ठेऊन 14 कोटी 80 लाखांची देयके कसल्याही प्रकारची अभिलेखे नसताना ऑनलाईन केल्याचा ठपका या तिघांवर चौकशीत ठेवण्यात आला होता. दरम्यान हलगर्जीपणा केल्याप्रकरणी बीडचे गटविकास अधिकारी रविंद्र तुरुकमारे यांच्या विरोधात देखील विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, कामांच्या अनियमिततेप्रकरणी ऑपरेटर बंडू राठोड, तांत्रिक सहाय्यक आबूज, सहायक कार्यक्रम अधिकारी शाम पंडित यांच्याविरोधात फौजदारी कारवाईचे आदेश सीईओ कुंभार यांनी दिले आहेत.
Leave a comment