पिठाच्या पोत्यातून होत होती गुटख्याची तस्करी
गेवराई । वार्ताहर
अत्यावश्यक वस्तू पुरविण्यासाठी पास घेऊन पीठाच्या पोत्यात गुटख्याचे पुढे भरून त्याची तस्करी करणारा टेम्पो चकलांबा पोलीसांनी पकडला. शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास महारटाकळी चेकपोस्टवर ही कारवाई करण्यात आली.यामध्ये तब्बल 23 लाखांचा गुटखा आढळून आला. सदरील टेम्पो हा हैद्राबाद येथून नाशिककडे जात होता. कारवाई त 23 लाखांचा गुटखा व 12 लाखांचा टेम्पो असा एकुण 34 लाखांचा ऐवज चकलांबा पोलीसांनी जप्त केला आहे.
चकलांबा पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक योगेश कोरडे हे महारटाकळी येथील चेक पोस्टवर कार्यरत आहेत. याठिकाणी सकाळी 11 वाजता बीडमधून पर जिल्ह्यात जाणार्या प्रत्येक वाहनाची पोलीस उपनिरीक्षक योगेश कोरडे आणि त्यांची टीम कसून चेकींग करत होती. यावेळी आयशर क्रं. (ए.के.01-5851) यामधून पीठाचे पोते परजिल्ह्यात घेवून जात असल्याचे चालकाने पोलीसांनी सांगितले. मात्र पोलीसांनी तरी देखिल थांबवून त्याची चेकींग केली. यावेळी पोत्यामध्ये गुटखा ही असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी हा टेम्पो थेट चकलांबा पोलीस ठाण्यात लावून चालकासह अन्य एकाला ताब्यात घेतले. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश कोरडे, पोलीस हवालदार कांबळे, कांदे, पो.ना.सय्यद चाँद यांनी केली. यावेळी महसूलचे बी.बी.मगर उपस्थित होते.कारवाईनंतर याची माहिती अन्न औषध प्रशासनाच्या अधिकार्यांना देण्यात आली. यानंतर अन्नसुरक्षा अधिकारी ए.बी.भिसे, एच.आर.मरेवार यांनी चकलांबा येथे जाऊन पकडण्यात आलेल्या गुटख्याचा पंचनामा केला असून त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अन्नसुरक्षा अधिकारी ए.बी.भिसे यांनी सांगितले.
Leave a comment