आष्टी । वार्ताहर
दरोडा टाकण्याच्या उद्देशाने अहमदनगर जिल्ह्यातून सीमाबंदी आदेशाचे उल्लंघन करत आष्टीत दाखल झालेल्या टोळीचा अंभोरा पोलिसांनी पर्दाफाश केला. शुक्रवारी (दि.1) अंभोरा पोलिसांनी 1 मे रोजी सय्यदमीर लोणी येथे ही कारवाई केली. यातील तिघे ताब्यात असून दोघे फरार आहेत.
भगवान इंप्रेल चव्हाण (22), संतोष नंदू भोसले (21) बडीशेप काळू भोसले (सर्व रा.वाळूंज जि.अहमदनगर) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. इतर दोघे फरार आहेत. शुक्रवारी ते लोणी सय्यदमीर येथे मध्यरात्री दुचाकीवरुन (क्र.एमएच सीपी-1938) जाताना संशयास्पद आढळले. त्यांच्याकडे अंभोरा पोलिसांनी चौकशी केली तेंव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडे लोखंडी गज आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला. अधिक चौकशी केली तेंव्हाते दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आल्याचे समोर आले. त्यांच्याविरुध्द जिल्हाबंदी, संचारबंदी आदेशाचे उल्लंघन तसेच दरोड्याची तयारी करण्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. तपास सुरु असल्याचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी सांगितले.
आरोपींचीही तक्रार;दोघांवर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा
याच प्रकरणातील आरोपी भगवान इंप्रेल चव्हाण यांनीही अंभोरा ठाण्यात तक्रार दिली. लोणी गावातून जात असताना सोमनाथ वाळके, अमोल वाळके व इतर अनोळखी लोकांनी गावात थांबवत ‘तुम्ही चोर आहेत, तुम्ही येथे चोथी करायला आले’ म्हणत जिवे मारण्याच्या उद्देशाने लाथाबुक्क्याने व काठीने मारहाण केली. गळ्यावर पाय ठेवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन मारहाण करणार्यांवर गुन्हा दाखल दाखल झाला.
------
त्रासाला कंटाळून आत्महत्या; पाच जणांवर गुन्हा
गेवराई । वार्ताहर
धमकी आणि त्रासाला कंटाळून एकाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. तालुक्यातील हरलाल नाईक तांडा, तहत केकतपांगरी येथे 30 एप्रिल रोजी ही घटना घडली. गेवराई ठाण्यात पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
ज्ञानेश्वर वसाराम राठोड असे मयताचे नाव आहे. याबाबत मयताचा भाऊ संतोष राठोड यांनी फिर्यादीत नमुद केल्याप्रमाणे आरोपींनी ‘आमची मुलगी कुठे आहे,तिला आणून द्या अन्यथा तुम्हाला मारु’ अशा ज्ञानेश्वरला धमक्या दिल्या होत्या. या धमक्या व जाचास कंटाळून ज्ञानेश्वरने राहत्या घरात पत्र्याच्या अँगलला साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यानुसार आरोपी पारुबाई बाबुराव पवार, अविनाश बाबुराव पवार, गोकुळ बाबुराव पवार (सर्व रा.रामनगर तांडा) अर्जुन देवसिंग राठोड, रामेश्वर अर्जुन राठोड (दोघे रा. रोकडा तांडा, गेवराई) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. सहाय्यक निरीक्षक तडवी तपास करत आहेत.
Leave a comment