जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन
गेवराई । वार्ताहर
बीडचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून संचारबंदी काळात चक्क पेट्रोलची विक्री करत आसलेल्या गेवराई येथील झमझम पेट्रोल पंपाला शनिवारी दुपारी सिल करण्यात आले आहे. गेवराई तहसील प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात या पंपाला सिल ठोकल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान शहर परिसरातील अनेक पेट्रोल पंप चालक संचारबंदीच्या नावाखाली जादा दराने इंधन विक्री करत आहे. शिवाय शासनाने सरकारी कर्मचारी यांना दिलेल्या पासेसच्या नावाखाली पंप धारकांनी एक प्रकारे गोरख धंदा सुरू केला आसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे देशात सर्वञ संचारबंदी लागू असून या बंदीचे आदेश पायदळी गेवराई तालुक्यातील पेट्रोल पंप धारक तुडवीत आसल्याचे दिसून येत आहे. सरकारी कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कुणालाही पेट्रोल देण्याचे आदेश नाहीत. माञ गेवराईतील अनेक पेट्रोल पंप धारक सर्रास कुणालाही दिवसा ढवळ्या पेट्रोल विक्री करु लागल्याने शहरात व तालुक्यातील अनेक जण मोटारसायकल धारक विना कारण फिरत आहे. शनिवारी दुपारी गेवराई शहरातील बीड रोडवरील झम..झम.. पेट्रोल पंप येथे सर्रास पेट्रोल विक्री होत आसल्याची माहिती तहसील प्रशासनाला मिळाली. त्या अनुषंगाने गेवराईचे तहसीलदार धोंडिबा गायकवाड, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांनी पंपावर जाऊन पुढील कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलिस बंदोबस्तात या पंपाला शनिवारी दुपारी चारच्या सुमारास सिल करण्यात आले आहे. दरम्यान गेवराई शहरात अशा प्रकारे पंप धारक पेट्रोल विक्री करत आसल्यास तहसील प्रशासनाला कळवावे असे अवाहन नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांनीसांगितले. गेवराई शहरात संचारबंदीच्या नावाखाली अनेक पंप धारकांनी जादा दराने व कुणालाही पेट्रोल विक्री करत असुन एक प्रकारे त्यांनी तालुक्यात गोरख धंदा सुरू केला आसल्याचे सर्व सामान्य नागरिकांमधून बोलले जात आहे. दरम्यान गेवराई शहरात व तालुक्यातील पेट्रोल पंप धारक सर्रास पेट्रोल विक्री करत असुन जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी होत आहे. यावेळी पोलिस उप निरिक्षक मनीषा जोगदंड, आईटवार आदिच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आले आहे.
----
Leave a comment