अंबाजोगाई । वार्ताहर
अंबाजोगाई तालुक्यातील भावठाणा या गावचे रहिवासी ऊसतोड मजुर हे राजाराम पाटील सहकारी साखर कारखाना इस्लामपुर (जि सांगली) या कारखान्यावरून नुकतेच परतले आहेत. सध्या या ऊसतोड मजुर कुटुंबांना
सानेगुरूजी विद्यालय,भावठाणा या शाळेत क्वारंटाईन करून ठेवले आहे.या ऊसतोड मजुरांच्या टोळीतील 15 कुटुंबांना खाण्यासाठी काहीही धान्य व जीवनावश्यक वस्तू नाहीत. हे समजल्यानंतर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.संदीप घोणसीकर यांच्या अवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत आणि गटशिक्षणाधिकारी रंगनाथ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.संदीप घोणसीकर यांचे हस्ते आणि मान्यवरांचे उपस्थितीत सानेगुरूजी विद्यालय,भावठाणा या शाळेत जावून सोशल डिस्टन्स पाळून व मास्क वापरून सदरील ऊसतोड मजुरांच्या कुटुंबांस अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.यावेळी भावठाणा केंद्राचे केंद्रप्रमुख सुर्यकांत टेकाळे,शिक्षक-मैत्री प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विजय रापतवार,तालुका क्रीडा समन्वयक दत्ता देवकते,भावठाणा गावचे ग्रामविकास अधिकारी अरविंद सरवदे, पोलीस अधिकारी गुट्टे,जाधव साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.अंबाजोगाई तालुक्यातील सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने नुकतेच 115 गरजू कुटुंबांना सामाजिक बांधिलकी जोपासत अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले होते.त्यानंतर आता पुन्हा ऊसतोड मजुर कुटुंबियांना अन्नधान्याच्या किटचे वाटप केले व माणुसकी जोपासली त्याबद्दल सर्व शिक्षक बांधवांचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.
Leave a comment