आष्टी । वार्ताहर
आष्टी तालुक्यातील कडा येथे दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला ग्रामदैवत हजरत मौलाली बाबांची सर्वात मोठी यात्रा भरत असते. परंतु यावर्षी कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव होत असल्याने यात्रा उत्सव रद्द करण्यात आला असल्याची माहिती सरपंच अनिल ढोबळे यांनी दिली. यावर्षी दि.7 व 8 मे रोजी हा उत्सव होणार होता.
कडा येथे मौलाली बाबांचा उत्सव दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या उत्सवास किमान एक लाखापेक्षा जास्त भाविकांची गर्दी असते. कडा व आसपासच्या गावातील परजिल्ह्यात, परराज्यात गेलेले सर्व कडेकर यात्रोत्सवास हमखास हजेरी लावून ग्रामदैवताचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त करून घेत असतात. परंतु यावर्षी कोरोनाव्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गावांमध्ये शांतता कमिटीची बैठक होऊन त्यामध्ये सदरील यात्रा-उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोनशे वर्षात यात्रा रद्द होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने अनेक भाविकांच्या श्रद्धेवर विरजण पडले आहे. सदरील यात्रा उत्सव हा आठ दिवस सुरू असतो, यामध्ये रहाट पाळणे, सर्कस, मौत का कुआ, जादूगार, विविध खेळणी, मिठाईची दुकाने मोठ्या प्रमाणावर येत असतात. या यात्रेत दुरदूरवरून अनेक कलाकार येऊन कला सादर करीत असत. यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत होती. यात्रा उत्सवाच्या दुसर्या दिवशी निकाली कुस्त्यांचा जंगी हंगामा भरविला जातो यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत मल्ल येऊन आखाडा गाजवीत असत. तसेच या आखाड्यात अनेक महिला कुस्तीपटू हमखास हजेरी लावत असत. दूरवरून अनेक पैलवान मंडळी आपल्या कलेचे प्रदर्शन करीत असत परंतु यावर्षी कोरोणाने हा उत्सव देखील रद्द केला आहे.
Leave a comment