आष्टी । वार्ताहर
पश्चिम महाराष्ट्रातून आष्टी तालुक्यात परतलेल्या ऊसतोड मजुरांच्या थेट पालावर जात विजय गोल्हार यांनी त्यांना किराणा पोहोच केला.
साखर कारखाना गळीत हंगाम संपूनही लॉकडाऊनमुळे अनेक ऊसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्रात अडकले होते. शासनाने त्यांना आपल्या गावी परतण्याची परवानगी दिल्यावर हे ऊसतोड कामगार आपापल्या गावी परतले. मात्र त्यांना थेट आपल्या घरी न जाता गावाबाहेर शेतातच क्वारंटाइन व्हावे लागले. कुठे शाळेत तर बहुतेक ठिकाणी पाणी उपलब्ध असेल अशा ठिकाणी झोपड्या करून हे कामगार आपले कुटुंब आणि जनावरांसह राहत आहेत. त्यांना किराणा किंवा इतर जीवनावश्यक साहित्य मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत होती. ऊसतोड कामगारांचे आष्टी तालुक्यातील नेते विजय गोल्हार यांनी अनेक गावातील संख्येनुसार किराणा मालाचे वर्गीकरण केले. आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे गणेश मंडळ आष्टी यांच्या माध्यमातून थेट त्यांच्या पालावर जात किराणा आणि अन्न धान्य वितरण केले. इतकेच नाही तर त्या गावातील इतर गोरगरिबांना आणि दिव्यांग व्यक्तीना देखील हा किराणा दिला. लिंबोडी येथे किराणा वाटप करताना सरपंच आदिनाथ आंधळे, माजी सरपंच समाधान आंधळे, हभप आंधळे महाराज आणि इतर उपस्थित होते.
Leave a comment