केज । वार्ताहर
ज्यांच्या माथी गुन्हेगारीचा शिक्का बसलेला उघडी नागडी लेकरं भर उन्हात अनवाणी चालणार्या बाया-बापुड्या आणि या कोरोनाचे महामारीत अन्न-पाण्या वाचून भुकेने व्याकूळ अशा पारधी समाजातील कुटुंबाना नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या माध्यमातून मनिषाताई घुले आणि विजयाताई कांबळे, ज्योतीताई सांबरे, यांनी अगदी पिठा पासून ते मिठा पर्यंत मदत केली.
केज तालुक्यातील चिंचोली माळी जवळील एका पारधी समाजाच्या वस्तीवर भर दुपारी दोन महिला जातात. तेथील दृश्य पाहून त्या अचंबित होतात. अगदी दोन महिन्यांपासून ते बारा तेरा वर्षा पर्यँतीची मुले ही उघडी नागडी असल्याचे दिसते. भर उन्हातही अगदी अनवाणी पायाने आणि तळपत्या उन्हात ती फिरत आहेत. अशीच अवस्था महिलांची आणि वृद्धांची सुद्दा; पत्र्याच्या शेडमध्ये केवळ निवारा असावा म्हणून तेवढाच आसरा. वस्तीवर कुठल्याच मूलभूत सुविधा नाहीत. त्यातही कहर म्हणजे कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या भीतीने त्याचा संसर्ग फैलावू नये म्हणून देशात लॉकडाऊनमुळे या आदिवासी भटक्या कुटुंबाची होत असलेली उपासमार. याची माहिती काही पत्रकारांच्या मार्फत नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या सौ. मनिषाताई घुले आणि त्यांच्या सहकारी सौ विजयाताई कांबळे यांना समजली होती.
यावरून त्या दोघी भर उन्हात एका टेम्पोत जीवनावश्यक वस्तू त्यात अगदी चांगल्या प्रतीचे गव्हाचे पीठ, तेलाचा डब्बा, तांदूळ, साखर, चहा पावडर, शेंगदाणे,अंगाच्या व कपड्याच्या साबून, रवा, मैदा, बिस्कीट, मिरची पावडर, हळद, मसाला, खोबर्याचे तेल, उपीट व शिर्याचे पौष्टिक अशा आहाराचे बंद पॅकेट आदी सर्व साहित्य या आदिवासी पारधी समाजाच्या चिंचोली माळी ता . केज येथील पालावर जाऊन वाटप केले. मात्र याचा ना कुठे गवगवा ना गाजावाजा न करता दहा कुटुंबाना सर्व साहित्य वाटप केले. यावेळी मनिषाताई घुले, विजयाताई कांबळे, पत्रकार गौतम बचुटे हे उपस्थित होते. आता पुढे पालावर जाऊन महिला व मुलांच्या कपड्यांची मापे घेऊन त्यांना कपडे वाटप करण्याचा मी निर्धार केला आहे असे मनिषाताई घुले म्हणाल्या. तर विजयाताई कांबळे म्हणाल्या, पालवर राहणारी आदिवासी समाजातील लोक सुद्धा आपले देश बांधवच आहेत आणि त्यामुळे आम्ही त्यांना शक्य होईल ती मदत केली.
Leave a comment