बीड । वार्ताहर
मराठवाडा शिक्षक संघाने कोरोना महामारी रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार राबवीत असलेल्या विविध उपाययोजनांसाठी 51 हजार रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केलाआहे. मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष पी.एस. घाडगे, संघटनेचे जेष्ठ नेते एस.जी. स्वामी, बंडू आघाव, के.आर.कसबे आणि महादेव धायगुडे यांनी मराठवाडा शिक्षक संघाच्या केंद्र कार्यकारिणीच्या वतीने परळीचे तहसीलदार डॉ. विपिन पाटील यांचेकडे मदतीचा धनादेश सुपूर्त केला.
या बाबत अधिक माहिती अशी की कोरोना महामारी हे अखिल मानवजातीवर आलेले संकट आहे. संपूर्ण जग या विषाणूच्या विळख्यात सापडलेले आहे. महाराष्ट्रातही हा विषाणू हातपाय पसरतो आहे. राज्यातील डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस या संकटाचा धैर्याने मुकाबला करत आहेत. गोरगरिबांना मदतीचा हात दिला जात आहे. शिक्षक आणि शिक्षणाच्या प्रश्नांवर गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ लढा देत असलेल्या मराठवाडा शिक्षक संघाच्या केंद्र कार्यकारिणीने आपले सामाजिक ऊत्तरदायित्व निभावण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी मदत देण्याचा निर्णय घेतला आणि त्या नुसार मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष पी.एस.घाडगे यांनी पदाधिकार्यांसह जावून आज बुधवार दिनांक 29 एप्रिल रोजी परळी तहसीलदार डॉ. विपिन पाटील यांचेकडे 51 हजार रूपयांचा धनादेश सुपूर्त केला आहे.
Leave a comment