गेवराई । वार्ताहर
वडीलांच्या मृत्यूनंतरच्या धार्मिक विधीसाठी येणारा खर्च गोरगरिब कुटुंबासाठी वापरून, गुळज (ता. गेवराई) येथील 65 गरिब कुटूंबाला किराणा कीटचे वाटप करून वडिलांची इच्छा पूर्ण केली आहे. या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
गेवराई येथील सामाजिक कार्यकर्ते संभाजी मोटे यांचे वडील आप्पासाहेब माधवराव मोटे यांचे 25 एप्रिलला रोजी निधन झाले. ‘माझ्या मृत्यूनंतर धार्मिक विधीसाठी येणारा खर्च गोरगरिब कुटुंबाच्या भल्यासाठी उपयोगात आणावा’,अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे, मृत्यूनंतरच्या धार्मिक कार्यक्रमा सारख्या रूढी परंपरेला फाटा देत दाहव्याचा व इतर कार्यक्रमाचा खर्चाची रक्कम गोरगरिब कुटुंबासाठी उपयोगात आणण्याचा निर्णय स्व.मोटे यांच्या इच्छेनुसार घेतल्याचे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले आहे. त्यानुसार बुधवारी ता. 28 रोजी सकाळी अकरा वाजता गुळज ता. गेवराई येथील गोरगरीब 65 कुटुंबियांना किराणा किट व स्वतःच्या शेतातला प्रत्येकी 10 किलो गहू मदत म्हणून दिला आहे. यावेळी संभाजी आप्पासाहेब मोटे, भाऊसाहेब प्रतापराव मोटे, महेश उत्तमराव मोटे, बाळासाहेब धिरडे यांची उपस्थिती होती.
Leave a comment