मुख्याध्यापकांना शिक्षणाधिकार्यांचे पत्र
बीड । वार्ताहर
महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी सर्व शाळांमध्ये ध्वजारोहण केले जाते. यंदा मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे या प्रथेला फाटा दिला जात आहे. मुख्याध्यापक शिक्षकांनी शाळांमध्ये जाऊन महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण करु नये असे आदेश शासनाने दिले असून त्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी अजय बहिर यांनी गटशिक्षणाधिकार्यांना व मुख्याध्यापकांना आदेश काढून सूचना दिल्या आहेत. पहिल्यांदाच महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणाच्या प्रथेत खंड पडणार आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सध्या देश पूर्णत: लॉकडाऊन केला गेलेला असून 3 मे पर्यंत हा दुसर्या टप्प्यातला लॉकडाऊन असेल. त्यापुढे कुठे लॉकडाऊन वाढणार, कुठे नाही याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी 3 मे पर्यंत निश्चित लॉकडाऊन आहे. 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.शिवाय, हा कामगार दिनीही असतो. महाराष्ट्र दिनी शासकीय ध्वजारोहण केले जाते. सर्व शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालयांत ध्वजारोहण होत असते. मात्र, यंदा देश लॉकडाऊन आहे. शाळा यापूर्वीच बंद केलेल्या आहेत. शिक्षकांनाही चेक पोस्ट, रेशन दुकान व इतर काही ठिकाणी नियुक्ती दिली गेलेली आहे. दरम्यान, 1 मे रोजी मुख्याध्यापक, शिक्षक यांनी शाळेत जाऊन ध्वजारोहण करु नये, एकत्र येऊन गर्दी करु नये असे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने काढले आहेत.
Leave a comment