माजलगाव । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून फुलेपिंपळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आडते व्यापारी, शेतकरी, कर्मचारी यांच्यासाठी सभापती अशोक डक यांनी पुढाकार घेवून निर्जंतुकीकरण कक्ष उभारले आहे. अशा पद्धतीने निर्जंतुकीकरण कक्ष उभारणारी बीड जिल्ह्यातील ही पहिली बाजार समिती ठरली आहे.
फुलेपिंपळगाव येथील बाजार समितीच्या आवारात बुधवारी दि.29 एप्रिल रोजी दु.3 वाजता या निर्जंतुकीकरण कक्षाच्या उद्घाटनाचा मान बाजार समितीने मोठेवाडीतील सामान्य शेतकरी शेषेराव ज्ञानोबा नाईकवाडे यांना दिला. या प्रसंगी बाजार समितीचे सभापती अशोक डक, संचालक प्रभाकर होते, संजय बजाज, रामेश्वर टवाणी आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना सभापती अशोक डक म्हणाले, कोरोना लढा व्यापकपणे लढण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात असताना माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने या बाबत पुढाकार घेत निर्जंतुकीकरण कक्ष उभारला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या कक्षामुळे कोरोनावर अधिक प्रमाणात नियंत्रण ठेवता येईल. या दृष्टीकोनातून बाजार समितीकडून उपाय योजना आखण्यात आली आहे. बाजार समिती आवारात आडते व्यापारी, शेतकरी, हमाल मापाडी मुनिम, कर्मचारी यांचा वावर असतो. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी निर्जंतुकीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याचेही सभापती डक यांनी सांगितले. समितीच्या आवारात येणाऱ्या प्रत्येकाच्या हातावार सॅनेटारझर, हात धुण्यासाठी साबण आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या प्रत्येकाला तोंडाला मास्क बांधूनच आवारात प्रवेश दिला जातो. माजलगाव बाजार समितीच्या या उपक्रमाचे व नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Leave a comment