बीड | वार्ताहर
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या संपूर्ण देशभरात लॉकडाऊन आहे. जिल्ह्यात संचारबंदी आणि जमावबंदी लागू आहे. मात्र दीड महिन्यापासून घराबाहेर पडता येत नसल्याने आता मद्यपींचा संयम ढळू लागला आहे. चारचाकी वाहनातून दारू पिण्यासाठी बाहेर पडलेले तिघेजण ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात अडकले अन् त्यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हे दाखल झाले. शहरालगतच्या म्हसोबा फाटा परिसरात मंगळवारी (दि.28) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, विवेक आसाराम गव्हाणे (35), शरद महारुद्र गव्हाणे (35) व पंढरीनाथ दिलीप गव्हाणे (31,तिघे रा.पारगाव शिरस ता. बीड) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघे मंगळवारी सायंकाळी शहरालगतच्या उमरज फाटा शिवारातील म्हसोबा फाटाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका कारमध्ये क्र. (एम. एच. 11 बी.डी. 6009) चक्क दारू पीत बसले होते. याच दरम्यान बीड ग्रामीण ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी या भागातून गस्त करत होते. संशय आल्याने पोलीस तिथे पोहोचले तेव्हा त्यांना कारमध्ये तिघेजण मद्यपान करत असल्याचे आढळून आले. तिघांचीही चौकशी केली तेव्हा त्यांनी आपली नावे सांगितले, दरम्यान संबंधितांकडे संचारबंदीत वाहन घेवून फिरण्याचा कोणताही परवाना नसल्याचेही समोर आले.पोलिसांनी कारसह तिघांनाही ताब्यात घेत ग्रामीण ठाण्यात आणले. पो.शि. तानाजी डोईफोडे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती बीड ग्रामीणचे सहाय्यक निरीक्षक सुजित बडे यांनी दिली. ही कारवाई उपनिरीक्षक माळी, पोलीस कर्मचारी सानप व डोईफोडे यांनी केली.
विनापरवाना वाहनासह फिरणाऱ्या तिघांवर गुन्हा
अत्यावश्यक सेवेचा कोणताही पास नसताना कारमधून (क्र.एम.एच.12 एम डब्ल्यू 4067) बीडकडे येणाऱ्या तिघांविरुद्ध ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी शहरालगतच्या म्हसोबा फाटा परिसरात ही कारवाई करण्यात आली. वैभव विष्णुदास डेगळे (23), ज्ञानेश्वर रामदास डेगळे (23, दोघे रा. ईटकुर ता.गेवराई) शिवराज संदीप बहिर (31 रा. शिरापूर) अशी त्यांची नावे आहेत. हे तिघे कारमधून म्हसोबा फाटामार्गे बीडकडे येत होते. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही, त्यामुळे विनापरवाना वाहन घेऊन रस्त्यावर फिरून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पो.शि. तानाजी डोईफोडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
Leave a comment