अनेक कामगारांपर्यंत प्रशासनाची मदत पोहचलीच नाही
बीड । वार्ताहर
ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परराज्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात गेलेल्या ऊसतोड कामगारांपैकी 32 हजार ऊसतोड कामगार परत आले असून अद्यापही कामगार मोठ्या प्रमाणात येणे बाकी आहे. जिल्ह्यामधून 4 लाखाहून अधिक कामगार जिल्ह्या आणि राज्याबाहेर जातात. जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत केवळ 32 हजार कामगार आल्याचा आकडा आहे, मात्र खुष्कीच्या मार्गानेही हजारो कामगार गावात दाखल झाले आहेत. जे कामगार जिल्हा प्रशासनाने गावामध्ये ग्रामपंचायत अथवा शेतामध्ये क्वॉरंटाईन केले आहेत त्यांच्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून बीड तालुक्यातील पाच ते सहा गावांमध्ये ऊसतोड कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. हीच परिस्थिती धारुर, माजलगाव आणि आष्टी तालुक्यात आहे. प्रशासनाने ऊसतोड कामगारांना मोठ्या थाटामाटात जिल्ह्यात आणले मात्र त्यांचा भूकबळी जावू नये याची काळजीही प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील 20 चेकपोस्टवरुन 18 एप्रिलपासून 28 एप्रिलपर्यंत गेल्या दहा दिवसाच्या काळात 32 हजार ऊसतोड कामगार आल्याची नोंद आहे. जर 4 लाख ऊसतोड कामगारांचे स्थलांतर होत असेल तर ऊर्वरित साडेतीन लाख ऊसतोड कामगार अजून येणे बाकी आहेत. आंध, तेलंगणा, कर्नाटक या राज्यात बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणात अजुनही अडकलेले आहेत. त्यांच्या येण्याच्या व्यवस्थेचा काय मार्ग निघाला हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. राज्यातील सांगली जिल्ह्यात अडकलेल्या जिल्ह्यातील 13 हजार मजुरांना सोडण्यासाठी मोठे राजकारण झाले. पंकजा मुंडेंनी यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर जिल्ह्यात दाखल झालेल्या ऊसतोड कामगारांची पूर्ण व्यवस्था करा असे आदेश जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी यंत्रणेला दिले. उसतोड कामगारांच्या क्वॉरंटाईन सेंटरवर कामगारांची देखभाल करण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती केली गेली. मात्र हे शिक्षक केवळ ऊसतोड कामगार त्या सेंटरवर आहेत का इतकेच पाहतात. त्यांच्या भोजनाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कोणी केली आहे? किंवा कोण करणार? याचे उत्तर कोणाकडेही नाही.
बीड तालुक्यातील पेंडगाव, कामखेडा, दगडी शाहजहानपूर खांडेपारगाव व इतर गावांमध्ये ऊसतोड मजुरांना आणून ठेवण्यात आले आहे. या मजुरांना गावाबाहेर शेतामध्ये झाडाखाली आसरा दिला आहे. सर्व ऊसतोड मजुरांचे संसार सध्या उघड्यावर आहेत. क्वॉरंटाईन केलेले ऊसतोड कामगार तंबाखू, बिडीसाठी थेट गावात येवून नागरिकांना मागणी करत आहेत. काही ठिकाणी गावकर्यांनीच त्यांची भोजन व्यवस्था केली आहे. मात्र कामखेडा व इतर काही तांड्यावर, परळी तालुक्यातील काही गावांमध्ये विशेषत: आष्टी तालुक्यातील काही गावांमध्ये मजुरांपर्यंत कसलीही शासकीय सुविधा पोहचलेली नाही. या ऊसतोड कामगारांना केवळ गावांपर्यंत सोडण्यात आले. मात्र त्यानंतर त्यांच्याकडे कुणीही पाहिले देखील नाही ही वस्तुस्थिती आहे. एकीकडे जि.प. आणि आरोग्य प्रशासनाकडून सर्व व्यवस्था केली गेल्याचे सांगण्यात येते मात्र दुसरीकडे प्रत्यक्ष पाहणी केल्यावर ऊसतोड मजुरांचे हाल पाहवत नाहीत. याकडे आता कोण लक्ष देणार हा खरा प्रश्न आहे.
मजुरांचे प्रश्न तात्काळ
सोडवा-पंकजा मुंडे
बीड जिल्ह्यात दाखल झालेल्या ऊसतोड मजुरांना तातडीने जिल्हा प्रशासनाने सुविधा द्याव्यात तसेच त्यांचे प्रश्न सोडवावेत यासाठी भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी जिल्हाधिकार्यांशी फोनवरुन संवाद साधला.ऊसतोड मजुरांच्या प्रश्नाबाबत प्रशासनाने तात्काळ व्यवस्था करावी अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली आहे.
Leave a comment