आष्टी । वार्ताहर
कोरोना या महामारीमुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता असल्यामुळे कामधंदा नसल्याने उपजीविकेचे साधन नष्ट झालेल्या दीन,दलित,दुर्बल घटकातील जनतेची उपासमारी होत आहे. यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतील काही टक्के रक्कम खर्च करण्याची परवानगी ग्रामपंचायत,नगरपंचायत व नगरपालीका प्रशासनाला देण्यात यावी व तसे आदेश तात्काळ द्यावेत अशी मागणी माजी आ.भीमराव धोंडे यांनी एका निवेदनाद्वारे केंद्रीय ग्रामविकासमंञी ,राज्याचे मुख्यमंत्री,ग्रामविकास मंत्री,बीडचे पालकमंञी यांचेकडे केली आहे.
ई-मेल द्वारे केलेल्या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, महामारीमुळे मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊन आणखी वाढणार आहे.ग्रामीण भागातील शेतमजूर दीन-दलित,अर्थिक दृष्ट्या दुर्बल,भूमीहिन,भटके,ऊसतोडणी कामगार,घटकातील नागरिकांना अन्नधान्य किराणामाल आणि भाजीपाला मिळण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.स्वयंसेवी संस्था दानशूर व्यक्तींनी आजवर मदत केली आहे.ती कमी पडत असल्यामुळे केंद्रीय ग्रामविकास आणि राज्याच्या ग्रामीणविकास विभागाने वित्त आयोगाच्या निधीतील काही रक्कम या वर्गातील जनतेतील उपजीविकेसाठी खर्च करण्याची गरज निर्माण झाली आहे.विकास कामे थोडे उशीरा झाले तरी चालेल परंतू गोरगरीब जनता जगविली पाहिजे. ग्रामपंचायत ,नगरपंचायत ,नगरपालीका यांचेकडे विकास कामांसाठीचा निधीही शिल्लक आहे त्यामुळे निधीही शासनाने खासबाब अंतर्गत याविषयी सहानुभूतीने विचार करावा.गरीबांना हक्काचे जेवनाची व्यवस्था ग्रामपंचायतने सार्वजनिक जागेत शारिरीक आंतर हा नियम पाळुन करावी अशी मागणी माजी आ.भीमराव धोंडे यांनी केली आहे.
------
Leave a comment