मॉबलिंचिग बाबत केज पोलिसांची जनजागृती
केज । वार्ताहर
एखाद्या अनोळखी व्यक्तींना चोर किंवा मुले पळविणारे समजून गावात कोणी मारहाण केल्याचे निदर्शनास आले तर अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच दुसर्या गावातील कुणी गावात आला तर त्याचीही माहिती पोलिसांना कळविली नाही तर सरपंच व ग्रामसेवकां विरुद्ध कार्यवाही केली जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी दिली.
बीड जिल्ह्यात मॉब लिंचिंगच्या घटना घडू नयेत व त्याची दक्षता घेणे व कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अतिरिक्त पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांनी सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क केले आहे. काही ठिकाणी गावात मुले पळविणारी टोळी गावात आली आहेत किंवा चोर आले आहेत. अशा अफवा पसरवून अनोळखी व्यक्तींना जमावकडून मारहाण होणे तसेच त्यांच्या जीविताला धोका संभवण्याच्या घटना घडत असतात. म्हणून त्याची दक्षता घेण्यासाठी केज पोलीसांनी मोहिम हाती घेतली आहे.
पोलीस निरीक्षक हे स्वतः त्यांच्या हद्दीतील गावागावात जाऊन धवनिक्षेपकावरून लोकांना आव्हान करीत आहेत. तसेच प्रत्येक गावच्या सरपंच आणि ग्रामसेवक यांना नोटीस दिली असून गावात कोणी अफवा फैलावीत असेल. तर त्याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात यावी. गावात आलेल्या अनोखी व्यक्तींची चौकशी न करता किंवा असा एखादा जमाव कृत्य करीत असेल त्यांना रोखणे आणि पोलिसांना माहिती देणे फौजदारी प्रक्रिया संहिता 1873 चे कलम 40 प्रमाणे कायद्याने बंधनकारक आहे. परगावाहून आपल्या गावात येणार्या प्रत्येक व्यक्तीची नोंद करून त्याची माहिती ग्राम सुरक्षा समिती आणि पोलिसांना देण्यात यावी. अशा प्रकारच्या नोटीस हद्दीतील ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. जे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस पाटील यात हलगर्जीपणा करुन माहिती दडवून ठेवतील की, ज्यामुळे अनुचित प्रकार घडेल आणि अनोखी व्यक्तींच्या जीविताला धोका संभवेल. जमाव कायदा हातात घेईल. अशा बाबतीत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात येऊन त्यांच्यावर प्रसंगी गुन्हे देखील दाखल करण्यात येणार आहेत अशी माहिती पो.नि.प्रदिप त्रिभुवन यांनी दिली.
Leave a comment