बीड । वार्ताहर
उच्च शिक्षणासाठी कोटा (राजस्थान) येथे गेलेले व लॉकडाऊनमुळे तिकडे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना मूळगावी पाठवण्याचा निर्णय झाल्यानंतर आता हे विद्यार्थी गावी परतू लागले आहेत. मंगळवारी (दि.28) 24 विद्यार्थी राजस्थानमधील एका खासगी बसने बीड शहरात दाखल झाले. तत्पूर्वी त्या सर्वांची शहागड चेकपोस्टवर आरोग्य तपासणी करण्यात आली. सर्वांना गृह विलगीकरणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारीही दुपारी चेकपोस्टवर दाखल झाले होते.
कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना मूळगावी आणण्यासाठी पालकांनी विनंती केली होती. यासंदर्भात राज्य शासनाने दखल घेवून बीडसह राज्यातील इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्वगृही आणण्यासाठी प्रयत्न केले सुरू केले होते. जिल्हा प्रशासनानेही यासाठी पाठपुरावा केला होता. राज्य सरकारच्या परवानगी नंतर या विद्यार्थ्यांना त्या-त्या जिल्हायात आणण्यासाठी यंत्रणा कामाला लागली होती. मंगळवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास कोटा (राजस्थान) येथे अडकलेल्या बीडच्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यात आणण्यात आले. एका खाजगी ट्रॅव्हल्सने हे 24 विद्यार्थी बीडला दाखल झाले. त्यांचे पालक त्यांना घेण्यासाठी बीड बसस्थानकाच्या पाठीमागील सिमेंट रोडवर आले होते. दरम्यान तिथे वाहतूक शाखा आणि याठिकाणी शिवाजीनगर पोलिसही दाखल झाले होते. पोलिसांनी त्यांची विचारपूस करत काही कागदपत्रेही तपासली. कोटा येथून अडकलेले विद्यार्थी परत आल्याने कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Leave a comment