गेवराई । वार्ताहर
महाराष्ट्र राज्यात काम करणार्या बाहेर राज्यातील कामगारांना आपल्या मुळगावी घेऊन जाणारा टेम्पो गेवराई पोलिसांनी मंगळवारी सकाळी गेवराई तालुक्यातील जालना व बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खामगाव शहागड येथील चेक पोस्टवर पकडण्यात आला आहे. या सर्व मजुरांना टेम्पोसह गेवराई पोलिस ठाण्यात आणून त्यांची नंतर नगर परिषदेच्या सुविधा केंद्रात रवानगी करण्यात आली आहे. हे सर्व मजूर बीड येथून आपल्या गावी निघाले होते. तर टेम्पो हा विजयवाडा कर्नाटक येथून आला आसल्याचे सांगण्यात येत आहे.
गेवराई तालुक्यातील खामगाव येथील बीड जिल्हाच्या चेकपोस्टवर मंगळवारी सकाळी आकराच्या सुमारास बीडकडून उत्तरप्रदेश व दिल्लीकडे (एच.आर.38 एस.2046) या क्रमांकाचा आयशर टेम्पो गेवराई मार्गाने निघाला होता. खामगाव चेक पोस्टवर कार्यरत आसलेले गेवराई ठाण्याचे सपोनि संदिप काळे यांना या टेम्पो बद्दल संशय आला. सदरील टेम्पो बंद बॉडीचा होता. हा टेम्पो ताब्यात घेऊन गेवराई पोलिस ठाण्यात आणला. या टेम्पोत उत्तरप्रदेश व दिल्लीकडे जाणारे 12 तरुण कामगार आढळून आले आहेत. या सर्वाना न.प.च्या आरोग्य कक्षात पाठविण्यात आले आहे. सदरील कामगार हे बीड येथील एका राजस्थानी हॉटेल मधून आपल्या गावाकडे निघाले होते. बीड मध्ये सकाळी हा टेम्पो येऊन येथील 13 कामगारांना टेम्पोतून दिल्लीकडे छुप्या पध्दतीने या कामगारांना घेऊन निघाला होता.
Leave a comment