अखेर महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांचं थेट भाष्य
ठाणे : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या माध्यमांनी घडवलेल्या चर्चांना स्वतः एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पूर्णविराम दिला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदा संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते घेतील, तो निर्णय आपल्याला वैयक्तिक पातळीवर आणि शिवसेना पक्ष म्हणून मान्य असल्याचा निर्वाळा एकनाथ शिंदे यांनी दिला.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
मी महाराष्ट्रातल्या जनतेला धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो, ही सर्वात मोठी व्हिक्टोरी आहे, महायुतीचा विश्वास, विकास कामे जी महाविकास आघाडीने थांबवली ती आम्ही सुरू केली, विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली.
मोठ्या प्रमाणावर हा विजय जनतेचा आहे, निवडणुकीच्या वेळी आम्ही मोठ्या प्रमाणात काम केले. रात्रभर काम करायचो, 2 3 तास झोपायचो आणि पुन्हा काम करायचो. मी मोजल्या नाहीत पण 70-80 सभा घेतल्या. मी आधी देखील कार्यकर्ता म्हणून काम केले पुढे देखील करेन. मुख्यमंत्री म्हणजे कॉमन मॅन म्हणून मी काम केले, तीच माझी धारणा होती, म्हणून लोकांपर्यंत पोहोचू शकलो. मी देखील सर्व सामान्य कुटुंबातून आलो आहे, शेतकरी कुटुंबातून आलो आहे.
लाडके भाऊ, शेतकरी, लाडक्या बहिणी अशा सर्वांसाठी काही ना काही करायचे होते. सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या लोकांना ते कसे कळणार.
एक को सिस्टिम तयारी झाली, घरातील सर्वांना काही न काही मिळणार हे तयार केले, सरकार म्हणून काय करणार अजून? मी आनंदी आहे, खुश आहे.
केंद्रातून मोदी शाह साहेबांचे पूर्ण पाठबळ आम्हाला होते. मला ते दिवस आठवतात जेव्हा मला मुख्यमंत्री करत होते.
आम्ही सर्व प्रश्न सोडवले, काहीच ठेवले नाहीत, .राज्याच्या प्रगतीचा वेग बघा, राज्य एक नंबरला नेण्याचा काम आम्ही केले. मागच्या अडीच वर्षात राज्य तिसऱ्या नंबरला गेले. आम्ही आल्या आल्या ते पहिल्या नंबरला आणले.
लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून माझी ओळख झाली, ही ओळख मला मोठी वाटते, मी समाधानी आहे,
आम्ही नाराज होऊन रडणारे नाही लढणारे लोक आहोत. माझ्या रक्ताचा शेवटच थेंब असे पर्यंत मी जनतेसाठी काम करेन. मी जीव तोडून काम केलं, त्यामुळेच हे यश प्राप्त झालं. मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेला काय मिळालं ते महत्त्वाचं आहे.
कुठे घोडे अडले नाही, मी मोकळ्या मनाचा माणूस आहे, ताणून ठेवणारा माणूस नाही. मला सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ हे मोठं पद मला नशिबाने मिळालं आहे. म्हणून मी मोदींना फोन करुन सांगितलं की सरकार बनवताना किंवा निर्णय घेताना कोणतंही अडचण माझ्यामुळे येणार नाही, तुम्ही आम्हाला मदत केली, संधी दिली, त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या, तुमचा निर्णय जो आहे, तो महायुतीचे आणि NDA चे प्रमुख म्हणून तुमचा निर्णय भाजपसाठी अंतिम असेल तसंच तो आमच्यासाठीही अंतिम असेल, असं सांगितलं. मोदी आणि अमित शाहांना मी फोन करुन सांगितलं, माझी अडचण नसेल, तुमचा निर्णय आम्हाला मान्य असेल असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
आता महायुती म्हणून आपली जबाबदारी वाढली आहे. महायुती म्हणून लोकांनी मँडेट दिलं आहे.
भाजपचा, महायुतीचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी जो काही निर्णय घेतील, त्यासाठी आमचे समर्थन आहे. त्यांची आज बैठक होईल, आमची देखील बैठक होईल, कुठेही काही अडसर नाही, स्पीड ब्रेकर आता नाही.
Leave a comment