मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. त्यामुळे, भाजप महायुतीने तब्बल 236 जागांसह स्पष्ट बहुमताचा जादुई आकडा गाठला
आहे. तर, काँग्रेस महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे, निवडणुकीत लाडक्या बहिणीने महायुतीच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिल्याचा अंदाज व्यक्त होत
आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरल्याचं म्हटलं. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आता,
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले आहेत. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) वर्षा निवासस्थानी लाडक्या बहिणींचं स्वागत करत शुभेच्छा दिल्या, तसेच
लाडक्या
बहिणींसाठी मोठी घोषणादेखील केली. शिवसेना महायुतीच्या जाहीरनाम्यातील वचनाप्रमाणे राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्यात येतील,असे
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
लाडक्या बहिणींनी राज्यात इतिहास घडवला आहे. राज्यात लाडकी बहिण योजना सुपरहीट झाली. माझी बहिण लाडकी, विरोधकांच्या मनात भरली धडकी, तर काही लोकं फिट येऊन चक्कर येऊन
पडल्याचे सांगत विरोधकांवर टीका केली. एक दैदिप्यमान विजय आपल्याला मिळाला आहे. विरोधकांना विरोधी नेता बनवायला संख्या नाही, तुम्ही साफ धूऊन टाकलंय अशा शब्दात मुख्यमंत्री
शिंदेंनी लाडक्या बहिणींवर कौतुकाचा वर्षाव केला. राज्यात यंदा लाडक्या बहिणींची लाट होती आणि त्यात विरोधक वाहून गेले, हा चमत्कार लाडक्या बहिणींनी केला. त्यामुळे, हा लाडका भाऊ तुमच्या
पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आता, लवकरच तुम्हाला देण्यात येणाऱ्या 1500 रुपयांचे 2100 करणार असून याचासुद्धा निर्णय आपण घेतल्याचे शिंदेंनी सांगितले. तुम्ही घेतलेला निर्णय यशस्वी
झाला, समोरच्या लोकांना तुम्ही डम्पिंगमध्ये टाकून दिलं असे म्हणत एकनाथ शिंदेंनी नाव न घेता विरोधकावर टीका केली.
दरम्यान, निवडणूक निकालानंतर सर्वच राजकीय नेत्याकडून लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला जात आहे. लाडकी बहीण योजनेमुळेच भाजप महायुतीला एवढा मोठा विजय झाल्याचं बोललं जात
आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीही यंदाच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा परिणाम झाल्याचं दिसून येत असल्याचं म्हटलं. सत्ताधाऱ्यांनी लाडक्या
बहिणींना योजना बंद होण्याची भिती दाखवून मतदानासाठीचं आवाहन केलं होतं, असेही पवार यांनी म्हटलं. तर, देवेंद्र फडणवीस यांनीही लाडकी बहीण योजनेमुळे मतदानाचा टक्का वाढला असून
आम्हाला त्याचा फायदा झाल्याचं म्हटलं आहे.
माझी लाडकी बहिण योजनेचे उद्दिष्ट काय?
या योजनेचा उद्देश महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक मदत करणे, त्यांना स्वावलंबी बनवणे आणि जीवनात उत्पन्नाचे स्थिर स्त्रोत उपलब्ध करून देणे हा आहे. विशेषत: ज्या महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, विधवा आहेत, घटस्फोटित आहेत किंवा त्यांना आधार नाही त्यांच्यासाठी ही योजना अधिक फायदेशीर आहे.
या योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो?
1. अर्जदार महिला महाराष्ट्राची कायमची रहिवासी असावी.
2. महिलेचे वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे.
3. केवळ विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला या योजनेअंतर्गत पात्र मानल्या जातील.
4. अर्जदाराचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
5. योजनेसाठी, अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता नसावा.
लाडकी बहिन योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1. आधार कार्ड
2. मतदार ओळखपत्र
3. मोबाईल क्रमांक
4. पासपोर्ट आकाराचा फोटो
5. बँक पासबुकची प्रत
6. अधिवास प्रमाणपत्र
7. रेशन कार्ड
8. स्व-घोषणा फॉर्म
योजनेसाठी अर्ज कसा करावा?
1. सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
2. 'अर्जदार लॉगिन' वर क्लिक करा आणि 'खाते तयार करा' वर जा.
3. तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि पासवर्डसह नोंदणी करा.
4. लॉगिन केल्यानंतर, मेनूमधील 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज' वर क्लिक करा.
5. अर्जामध्ये आवश्यक माहिती भरा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
6. फॉर्म सबमिट केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल.
लाडकी बहिण योजनेचे सध्याचे अपडेट
या योजनेंतर्गत आतापर्यंत महिलांना पाच टप्प्यात 9000 रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. ही योजना 28 जून 2024 रोजी सुरू करण्यात आली आणि राज्यातील लाखो महिलांना सहाय्य आणि स्वावलंबन प्रदान करण्याच्या उद्देशाने आणण्यात आली. या योजनेअंतर्गत महिलांना मासिक हप्ते मिळतात, जेणेकरून त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकेल.
योजनेच्या लाभासाठी काही महत्वाचे मुद्दे
जर तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले नसेल, तर योजनेचा लाभ घेण्यासाठी ते आधी करू घ्या.
ज्या लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत जुलै किंवा ऑगस्टचा हप्ता मिळाला नाही ते अधिकृत वेबसाइटला भेट देऊन स्थिती तपासू शकतात.
Leave a comment