महाराष्ट्रात एका टप्प्यात मतदान - राजीव कुमार
लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक येत्या रोजी टप्प्यांत पार पडणार आहे.
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवडणूक आयोगाची आज राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र व झारखंड या दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली. निवडणुकीची घोषणा होताक्षणी आचारसंहिता लागू झाली आहे. खरंतर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक हरयाणासोबत होणं अपेक्षित होतं. मात्र, जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेचं व सण-उत्सवांचं कारण देत निवडणूक आयोगानं महाराष्ट्राची निवडणूक हरयाणासोबत घेणं टाळलं होतं.
महाराष्ट्रात अशी होईल निवडणूक
अधिसूचना - २२ ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख - २९ ऑक्टोबर
उमेदवार अर्ज छाननी - ३० ऑक्टोबर
उमेदवार अर्ज मागे घेण्याची तारीख - ४ नोव्हेंबर
मतदानाची तारीख - २० नोव्हेंबर
निकालाची तारीख - २३ नोव्हेंबर
महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये टक्कर
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक यावेळी अनेकार्थांनी वेगळी आहे. यावेळी प्रथमच सहा प्रमुख पक्ष रिंगणात आहेत. त्यात भाजप, काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. मनसे आणि वंचित बहुजन आघाडी हे छोटे पक्षही आपली ताकद दाखवणार आहेत. महाराष्ट्रातील दोन बलाढ्य पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगानं मूळ पक्ष कोणाचे हा निर्णय दिला असला तरी जनतेच्या मनात काय आहे हे या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे.
महाराष्ट्राकडं देशाचं लक्ष
राज्यातील फाटाफुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे, शरद पवार व काँग्रेसच्या महाविकास आघाडीनं महायुतीला पराभवाचा दणका दिला होता. ४८ पैकी एकूण ३१ जागा मविआनं जिंकल्या होत्या. तर, महायुतीला अवघ्या १७ जागांवर समाधान मानावं लागलं. हीच कामगिरी महाविकास आघाडी विधानसभेत करून दाखवणार की महायुती त्यांना रोखणार याविषयी उत्सुकता आहे.
प्रचाराचे मुख्य मुद्दे
राज्यातील कायदा-सुव्यवस्था, राज्यातून बाहेर चाललेले उद्योग, बेरोजगारी, भ्रष्टाचार, सरकारी पैशाची उधळपट्टी हे मुद्दे महाविकास आघाडीकडून प्रामुख्यानं प्रचारात आणले जातील. तर, महिला व तरुणांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना, टोलमाफी आणि पायाभूत सुविधांचा विकास हे यावर महायुतीकडून भर दिला जाईल असं दिसतं. पक्षातील फोडाफोडी हा मुद्दा जुना असला तरी तो नव्यानं चर्चेत येण्याची चिन्हं आहेत.
Leave a comment