एसपींनी ठाणे प्रभारींकडून मागवला अहवाल; नागरिकांनी अफवा न पसरवण्याचे आवाहन
बीड | वार्ताहर
जिल्ह्यात बीड,गेवराई, वडवणी,माजलगाव या तालुक्यातील काही गावे, शहरे तसेच वाडी तांडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्यावेळी आकाशात ड्रोन घिरट्या घालत आहेत. याबाबत कसलीही माहिती प्रशासनाकडून दिली जात नसल्याने गावोगावच्या ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणे प्रभारीनी ड्रोन संदर्भांत इत्यंभूत माहिती घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ड्रोनच्या कंपन्यांशी संपर्क साधला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, अफवा पसरू नये. ड्रोनपासून धोका नाही हेही पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून रात्रीच्यावेळी आकाशात ड्रोन फिरत आहेत.याबाबत स्थानिक प्रशासनाला कसलीही माहिती नाही, ते माहिती घेऊन सांगतो असे उत्तर ग्रामस्थांना दिले जाते. त्यामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. असे असतानाच गुरुवारी (दि.22) रात्री बीड तालुक्यातील नारायणगड परिसर, माजलगाव तालुक्यातील टाकरवण, किल्लेधारूर तालुक्यातील प.पारगाव ,दहीफळ,गांवदरा तसेच इतरही काही ठिकाणी आकाशात ड्रोन फिरताना दिसले.त्यामुळे पुन्हा एकदा ड्रोन कोण उडवत आहे,त्यांनी स्थानिक प्रशासनाकडून याबाबत परवानगी घेतली आहे का, ते ड्रोन का घिरट्या घालत आहेत असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. दरम्यान या सर्व घडामोडीवर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
या ड्रोनपासून कुणालाही धोका नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. या संदर्भात आम्ही कंपन्यांशी संपर्क करून त्याचे वर्णन कळविले आहे. ड्रोनमुळे कुठेही चोरीच्या घटना घडलेल्या नाहीत तसेच ड्रोनमधून कशाचा मारा केला जात नाही. मात्र केवळ अफवा पसरून नागरिकांना मारहाण केली जात आहे. असे कुणीही करू नये, हे ड्रोन का फिरत आहेत, याचा सखोल तपास बीड पोलिस करत आहे. त्यामुळे विनाकारण अफवा पसरून कोणालाही मारहाण करू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी केले आहे.
Leave a comment