स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
बीड । वार्ताहर
माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोपा गाव शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल कंटेनर भरुन गुटखा पकडत मोठी कारवाई पाडली. पकडलेल्या गुटख्याची किंमत अंदाजे 75 लाख रुपये असून गुटख्यांसह कंटेनरची किंमत 1 कोटीच्या घरात असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले. पोलीस अधिक तपास करत आहेत.
तेलगाव (ता.धारुर) येथून परळीकडे गुटखा घेवून एक कंटेनर जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी भोपा शिवारात सापळा रचत कारवाई केली. या कारवाईत कंटेनर (क्र.एच आर 55 ए क्यू 6618) पोलीसांनी ताब्यात घेत पाहणी केली. या वाहनात अंदाजे 75 लाख रुपये किंमतीचा विविध कंपन्यांचा महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला गुटखा आढळून आला. तो कंटेनरसह ताब्यात घेण्यात आला. बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक संजय तुपे, सुशांत सुतळे, पो हे काँ.शेख नसीर, अशोक दुबाले, कैलास ठोंबरे, राजू पठाण, मारुती कांबळे, अर्जुन यादव, चालक गणेश मराडे, अतुल हराळे यांनी ही कारवाई केली. सदरचा गुटखा कर्नाटक राज्यातून उमरगा, नळदुर्ग सीमा ओलांडून आल्याची माहिती आहे. दोन जिल्ह्यापेक्षा अधिकची हद्द आणि एका राज्याची सीमा ओलांडल्यानंतर ही वाहतूक सुरक्षा पोलीस असतील किंवा स्थानिक पोलीस यांना एवढा मोठा कंटेनर कसा दिसला नाही? याबाबत आता प्रश्न उपस्थितीत होत आहेत.
Leave a comment