विठूनामासह, मुक्ताईंच्या जयघोषाने घाट परिसर दुमदुमला
बीड । सुशील देशमुख
विठूनामासह मुक्ताईंचा जयघोष करत श्रीक्षेत्र मुक्ताई नगर येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरककडे प्रस्थान ठेवलेल्या संत मुक्तांईच्या पालखी सोहळ्याने शनिवारी (दि.6) पाली (ता.बीड) नजीकचा धुळे-सोलापूर महामार्गावरील मांजरसुंबा घाट मोठ्या उत्साहात सर केला.या घाटादरम्यान संत मुक्ताईंचा पालखी रथ मध्यप्रदेशाथील नाचनखेडा येथील बैलजोडीसह इतर बैलजोडींच्या मदतीने ओढण्यात आला. मांजरसुंबाच्या घाटात पालखी सोहळ्यातील वारकर्यांनी शिस्तीचे दर्शन घडवले.
यंदा बुधवारी (दि.3) संत मुक्ताईंचा पालखी सोहळा बीडमध्ये दाखल झाला होता. पहिल्या दिवशी माळीवेस हनुमान मंदिरात पालखीचा मुक्काम झाल्यानंतर गुरुवारी दुसर्या दिवशीचा मुक्काम पेठ बीड भागातील श्री बालाजी मंदिरात झाला त्यानंतर शुक्रवारी (दि.5) पहाटे 6 वाजता पेठेतील श्री बालाजी मंदिरापासून संत मुक्ताईंचा पालखी सोहळा मार्गस्थ झाला होता. सुभाष रोड, जैन भवन समोर पालखी आल्यानंतर पालखी सोहळा प्रमुख रविंद्र महाराज हरणे व इतर वारकर्यांच्या उपस्थितीत पालखी रथातील संत मुक्ताईंच्या पादुका डोक्यावर ठेवून आजोबा गोविंदपंतांच्या समाधीस्थळी वाजत गाजत नेण्यात आल्या होत्या. याप्रसंगी वारकर्यांना संत मुक्ताई यांच्या नावाचा जयघोष केला. या ठिकाणी दोन्ही पादुकांचे पूजन करत दर्शन घेण्यात आले होते. दरम्यान नंतर बार्शी नाका मार्गे पालखी सोहळा शुक्रवारी पाली गावात मुक्कामी विसावला होता.
शनिवारी संत पालखी सोहळा कोळवाडीपासून पुढे घाटाकडे मार्गस्थ होत असताना वाटेवर ग्रामस्थांनी वारकर्यांची चहापानाची व्यवस्था केली होती. पुढे पालखी मांजरसुंब्याचा घाट सर करत असताना वारकर्यांनी आदिशक्ती मुक्ताईंचा जयघोष करत वारकर्यांनी मोठ्या उत्साहात घाट सर केला. नंतर घाट पुर्ण केल्यानंतर पालखी उदंडवडगाव येथे मुक्कामी रवाना झाली. पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, संत मुक्ताई संस्थानचे प्रमुख रवींद्र महाराज पाटील, विशाल महाराज खोले, ज्ञानेश्वर महाराज हरणे आदीसह पालखी सोहळ्यातील महिला-पुरुष वारकरी यावेळी उपस्थित होते.
पालखी सोहळ्यात बैलजोडीसह दोन अश्व
श्री संत मुक्ताईंच्या पालखी सोहळ्यासोबत दरवर्षी 2 बैलजोडी व 2 अश्व असतात. यातील 2 बैलजोडी नाचनखेडा (मध्यप्रदेश) येथील राजेश पाटील हे पालखीसाठी देत असतात.यंदाही त्यांनी बैलजोडी संत मुक्ताईंच्या पालखी सोहळ्यासाठी उपलब्ध करुन दिली आहे. या बैलजोडीने मांजरसुंब्याकडे जातांना संत मुक्ताईंचा रथ ओढला. यावेळी वारकरी विठू नामाच्या जयघोषात तल्लीन झाले होते.
रवींद्र महाराज हरणे यांनी सांगितला मांजरसुंबा घाटाचा इतिहास
-
यावेळी संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे प्रमुख रवींद्र महाराज हरणे यांनी घाटांचा इतिहास सांगितला. ते म्हणाले, पालखी मार्गावर सुरुवातीचा घाट बुुलढाणा जिल्ह्यात राजुर घाट येथे लागतो, दुसरा केवत आणि तिसरा घाट आनदंगड येथे लागतो. चौथा पालीचा मांजरसुंबा घाट लागतो. तसेच पाचवा घाट भूम तालुक्यातील कुंथलगिरीचा लागतो. या पाचही घाटांपैकी मांजरसुंबा घाटाशी संत मुक्ताईंच्या पालखी सोहळ्याचे परंपरेचं नातं जोडलं गेलं आहे. हा घाट आपल्या इतिहासाची साक्ष आहे. शोर्यांचे प्रतिक आहे. याच घाटातून आदिशक्ती संत मुक्ताईंचा पालखी सोहळा 315 वर्षांपासून प्रवास करते आहे. आता मात्र या घाटाचे स्वरुप पुर्णपणे बदलले आहे. मी 40 वर्षांपासून पाहतोय. पूर्वी पाण्याची सुध्दा व्यवस्था इथे नव्हती. गाडीला लावून पाण्याची कोठी वर न्यावी लागत होती. यासाठी बैलगाडी नंतर वाहनांचा उपयोग केला जात होता. कारण हा घाट वळणा-वळणाचा कठीण घाट होता. मात्र आता हा घाट पूर्ण बदलला सुलभ झाला आहे अशा आठवणींना रवींद महाराज हरणे यांनी यावेळी उजाळा दिला.
-
www.lokprashna.com News by Sushil Deshmukh
Leave a comment