वाळू माफियांकडून कलेक्शन करणार्यांना जिल्हाधिकारी पाठक यांचा दणका
बीड । वार्ताहर
जिल्हाधिकारी म्हणून सुत्रे हाती घेतल्यानंतर अविनाश पाठक यांनी महसूल प्रशासनाचा प्रमुख कशा पध्दतीने काम करत असतो याची चुणूक आपल्या कार्यशैलीतून दाखवून देण्यास सुरुवात केली आहे. गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील वाळु घाटातून वाळु उत्खननाकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत धोंडराई (ता.गेवराई) मंडळ अधिकारी पुरुषोत्तम सुधाकर आंधळे व तलाठी किरण प्रभाकर दांडगे यांना 4 जुलै रोजी निलंबित केले आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या या कारवाईने निष्काळजीपणा करणार्या कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान दोघांचीही विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.
गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील वाळुघाटाची पाहणी 3 जुलै रोजी केली असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळुचे उत्खनन झाल्याचे आढळून आले. वाळुच्या अवैध उत्खननावर लक्ष ठेवणे ही तलाठी व मंडळ अधिकारी यांची प्राथमिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यात अक्षम्य दिरंगाई केली आहे. त्यामुळे शासनाने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असा ठपका ठेवत राक्षसभुवन सज्जाचे तलाठी किरण प्रभाकर दांडगे व धोंडराईचे मंडळ अधिकारी पुरुषोत्तम सुधाकर आंधळे यांना अवघ्या 24 तासात (दि.4) रोजी निलंबित केले आहे.
दोघांचेही वर्तन शासकीय कामकाजात अक्षम्य दुर्लक्ष, कर्तव्यात सचोटी, न राखणारे निष्काळजीपणाचे व जाणून बुजुन टाळाटाळ करणारे आहे कर्तव्य परायनता न ठेवता ही गंभीर स्वरुपाची बाब आहे. गैरवर्तनाचे गांर्भीय विचारात घेवून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 चे नियम 4 मधील तरतुदी नुसार सदर आदेशाचे दिनांकापासून शासन सेवेतून निलंबित करण्यात येत असून पुढील आदेश काढले जाईपर्यंत ते निलंबीत राहतील असेही जिल्हाधिकारी पाठक यांनी आदेशातून स्पष्ट केले आहे. तसेच त्यांचे विरुध्द महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 चे नियम 8 अन्वये विभागीय चौकशी प्रस्तावीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी रुजू होताच कामकाजात दुर्लक्ष करणार्यांना दणका दिला आहे.
दीपा मुधोळ यांच्या कार्यकाळात सोकले होते कर्मचारी
बीड जिल्ह्यात विशेषत: गेवराई आणि माजलगाव तालुक्यात गोदावरी नदीपात्रात खुलेआम वाळू उपसा केला जात असल्याचे अनेकदा उघड झालेले आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या कार्यकाळात तर वाळूमाफियांनी धुमाकूळ घातला होता. चक्क जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या वाहनालाही धडक देत जखमी करण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यानंतर पोलीस व महसूल यंत्रणेने अॅक्शन घेत वाळूचा अवैध उपसा पूर्णपणे बंद केला होता. मात्र 15 दिवसानंतर हे पुन्हा सुरु झाले होते. नंतर तर काही वाळूमाफियाच दीपा मुधोळ यांच्या कॅबिनमध्ये दिसले होते. त्यामुळे महसूल कर्मचारीही वाळू माफियांच्या अवैध बेसुमार वाळू उपशाला समर्थन देत सोकले होते. अशा स्थितीत कारवाईची गरज होती.
खोमणेंची मारहाणही देवाण-घेवाणीतून
गेवराईचे तहसीलदार खोमणे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना आठवडाभरापूर्वीच घडली. या प्रकरणात एका वाळूमाफियाविरुध्द गुन्हाही दाखल झाला, मात्र हे प्रकरणही आर्थिक देवाण-घेवाणीच्या कारणावरुनच घडले होते. खोमणे आणि त्यांची यंत्रणा वाळू उपसा होत असताना दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही झाला होता.
Leave a comment