जिल्ह्यासाठी चार हजार १५० किलो मेटाल्डीहाईड कीटकनाशकाचा साठा उपलब्ध
बीड | सुशील देशमुख
गतवर्षी शंखी गोगलगायी किडीच्या रोगामुळे जिल्ह्यात तीन तालुक्यातील शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले होते. आता यंदा खरीप हंगामातील पेरणी पूर्ण होत असतानाच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर आणि शेतात काही ठिकाणी गोगलगायी आढळून येत आहेत. त्यासाठी कृषि विभाग सज्ज झाला असून जिल्ह्यात ४ हजार १५० किलो मेटाल्डीहाईड या कीटकनाशकाचा साठा राज्यस्तरावरून प्राप्त झाला आहे.प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरलेल्या सोयाबीन शेताची विशेषत: बांधाचे निरीक्षण करावे,असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.
गोगलगायी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड जिल्ह्यात ४ हजार १५० किलो मेटाल्डीहाईड या कीटकनाशकाचा साठा उपलब्ध झाला आहे. हा साठा संबधित तालुका कृषि अधिकारी तसेच नजीकचे तालुका बीज गुणन केंद्र व शासकीय फळरोपवाटिका याठिकाणी ठेवण्यात आला आहे. त्यातून जिल्ह्यातील २ हजार ७५ एकर एवढ्या क्षेत्राचे सहज संरक्षण होईल असा विश्वास कृषी विभागाला आहे.
शेतकऱ्यांनी नियंत्रणात्मक उपाययोजना म्हणून मेटाल्डीहाईड या कीटकनाशकाच्या गोळ्या २ किलो प्रती एकर या प्रमाणात बांधाच्या नजीकच्या भागात - प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रात वापराव्यात. त्यामुळे गोगलगायी या किडीचा प्रादुर्भाव रोखला जाईल. कीटकनाशक मुरमूऱ्यांना लावून शेतामध्ये फेकू नये, त्याने पशु-पक्षी यांना हानी होऊ शकते असाही सावधानतेचा इशाराही जिल्हा कृषी विभागाने दिला आहे. अधिक माहितीसाठी आपल्या स्थानिक क्षेत्राचे, कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांना संपर्क करावा तसेच अधिक तांत्रिक माहितीसाठी कृषि विज्ञान केंद्र डिघोळअंबा, (ता. अंबाजोगाई) कृषि विज्ञान केंद्र खामगाव, (ता. गेवराई) येथील शास्त्रज्ञ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे.
प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी हे करा
गोगलगायीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पेरलेल्या सोयाबीन शेताची विशेषत: बांधाचे निरीक्षण करावे, बांध स्वच्छ ठेवावे, बांधावर गोगलगायी आढळल्यास शेतात संध्याकाळच्या वेळेस जागोजागी गवताचे ढीग अथवा गुळाच्या पाण्यामध्ये रिकामे बारदाने भिजवून ठेवावे. सकाळी त्या ढीगांखाली लपलेल्या गोगलगायी जमा करून मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात असे आवाहन अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे.
Leave a comment