पावसामुळे वेग; जिल्ह्यात खरिपाची 45 टक्के पेरणी उरकली
बीड । सुशील देशमुख
जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात बीड जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झाला. या पावसाच्या जोरावर शेतकर्यांनी लगबगीने खरीपाची पेरणी सुरु केली. जिल्ह्यात 19 जून अखेरपर्यंत 45.42 टक्के म्हणजेच तब्बल 3 लाख 56 हजार 886 हेक्टर क्षेत्रावर पेरणी उरकण्यात आली आहे. सोयाबीनच्या उत्पादनाला यंदा शेतकर्यांनी ब्रेक दिला असून ‘पांढर सोनं’ असणार्या कापसाची मात्र सर्वाधिक 1 लाख 77 हजार 952 हेक्टरवर लागवड केली आहे. आगामी काही दिवसांत कापसाची लागवड वेगाने झालेली असेल. दरम्यान गेवराई तालुक्यात खरीपाची सर्वाधिक 68 हजार 376 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाल्याने शेतकर्यांनी बी-बियाणे खरेदी करत खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे. जिल्ह्यात 12 जून अखेरपर्यंत 4.91 टक्के म्हणजे जवळपास 5 टक्के पेरण्या पुर्ण झाल्या होत्या.त्यानंतर मात्र पेरणीचा वेग वाढला असून अवघ्या आठवडाभरात खरीपाची 45.42 टक्के पेरणी पुर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर यांनी लोकप्रश्नशी बोलताना दिली.जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र 7 लाख 85 हजार 786 इतके आहे. 1 जून ते 19 जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत 155 मि.मी.पाऊस (27.4 टक्के) झाला आहे.
जिल्ह्यात कापसाचे सरासरी क्षेत्र 3 लाख 55 हजार 494 हेक्टर आहे. यापैकी 1 लाख 77 हजार 952 हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली असून ती सर्वसाधारण क्षेत्राच्या 50 टक्के आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र 2 लाख 26 हजार 234 हेक्टर आहे. यापैकी 1 लाख 33 हजार 22 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ती सर्वसाधारण क्षेत्राच्या 59 टक्के आहे. जिल्ह्यात बाजरीचे क्षेत्र 69 हजार 485 हेक्टर असून यापैकी 7 हजार 488 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तूरीचे क्षेत्र 53 हजार 238 हेक्टर क्षेत्र आहे. पैकी 18 हजार 691 हेक्टरवर पेरणी झाली. ती सर्वसाधारण क्षेत्राच्या 35 टक्के आहे. याशिवाय मूगाचे सरासरी क्षेत्र 21 हजार 876 हे.असून 4 हजार 691 हेक्टरवर पेरणी झाली आहे. उडीदाचे जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र 28 हजार 838 हेक्टर आहे. 19 जूनपर्यंत 13 हजार 469 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
शेतकर्यांमध्ये पेरणीचा उत्साह!
वेळेवर आलेला पाऊस, आणि गतवर्षीच्या खरीपातील दुष्काळाची कसर भरुन काढण्याची शेतकर्यांना असलेली उत्कंठा यामुळे जिल्ह्यात 11 तालुक्यातील 3 लाख 56 हजार 886 हेक्टर क्षेत्रावर शेतकर्यांनी चाढ्यावर मुठ ठेवत खरीपाची पेरणी पुर्ण केली आहे. सोयाबीनचे भाव पडल्याने यंदा शेतकर्यांनी कापूस आणि तूरीवर भर दिला आहे.
Leave a comment