पत्रकार परिषदेत एस.पी.नंदकुमार ठाकूर यांची माहिती
बीड । सुशील देशमुख www.lokprashna.com
बीड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेले 170 पदे भरण्यासाठी येत्या 19 जून 2024 पासून येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. या भरतीमध्ये पोलीस शिपायांची 164 पदे भरली जाणार असून पोलीस शिपाई चालक पदाची 5 तर पोलीस शिपाई बँड्समॅन हे 1 पद भरले जाणार आहे. या भरतीसाठी पोलीस शिपाई पदांसाठी 7 हजार 545, चालक पोलीस शिपाई पदासाठी 693 तर पोलीस शिपाई बँड्समन पदासाठी 191 आवेदन अर्ज प्राप्त झाले आहेत. येत्या बुधवार 19 जूनपासून सर्व पदांच्या मैदानी चाचणीचे वेळापत्रकही जाहीर झाले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आज (दि.17) रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर अधीक्षक सचिन पांडकर गुन्हे शाखा निरीक्षक संतोष साबळे यांची उपस्थिती होती.
यावेळी माहिती देताना पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर म्हणाले, पोलीस भरतीप्रक्रिया राबवत असताना पाऊस आला तर त्यादिवशीची प्रक्रिया दुसर्या दिवशी राबवली जाईल. भरतीप्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पाडली जाईल, पोलीस शिपाई पदासाठी प्राप्त झालेल्या एकूण 7 हजार 545 अर्जापैकी 6 हजार 201 अर्ज पुरुष उमेदवारांचे व 1 हजार 344 अर्ज महिला उमेदवारांचे प्राप्त झाले आहेत. 19 जून ते 28 जून या कालावधीत संपूर्ण भरती प्रकिया सुरु राहिल. यात 19 रोजी पोलीस शिपाई पदासाठी 500 उमेदवारांना सकाळी साडेपाच वाजता बोलावले जाईल. 20 रोजी 750, तर 21, 22, 23, व 24 जून रोजी दररोज 1 हजार उमेदवारांची मैदानी चाचणी होईल. तेस 25 रोजी 951 व 26 जून रोजी 1 हजार 344 उमेदवारांची शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी होईल. नंतर 27 रोजी पोलीस शिपाई बॅन्डस्मॅन या पदासाठीच्या 191 उमेदवारांची मैदानी चाचणी होवून दि. 28 जून रोजी पहाटे साडेपाच वा. चालक पोलीस शिपाई पदाच्या 993 उमेदवारांची शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी होईल.www.lokprashna.com
पोलीस भरती मैदानावर 1600 मिटर धावणे, महिला उमेदवार यांची 800 किमी धावणे, 100 मीटर धावणे, गोळाफेक, बाबत मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे.पात्र सर्व उमेदवारांची बायोमेट्रिक हजेरी व फेस स्कॅन करण्यांत येणार आहे. तसेच प्रत्येक मैदानी चाचणी ठिकाणी पुन्हा सर्व उमेदवार यांची बायोमेट्रीक हजेरी व फेस स्कॅन केले जाईल. 1600 मिटर धावणे, महिला उमेदवार यांना 800 मीटर धावणे, व 100 मिटर धावणे या मैदानी चाचणीसाठी आरएफआयडी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यांत येणार आहे. मैदानी चाचणीचा सर्व परिसर सीसीटिव्ही निगराणीखाली ठेवण्यांत येणार आहे. तसेच मैदानी चाचणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक दिवशी सदरचा डाटा बॅकअप करण्यात येणार आहे. प्रत्येक मैदानी चाचणीच्या ठिकाणी सीसीटिव्ही, हॅन्डी कॅमेरा व एक पोलीस अंमलदार कॅमेरामॅन यांची नियुक्ती करण्यांत आलेली आहे. प्रत्येक मैदानी चाचणी सीसीटिव्ही बरोबरच हॅन्डी कॅमेरामध्ये रेकॉर्ड करण्यांत येणार आहे.
पात्र उमेदवार यांना चेस्ट नंबर दिला जाणार असून ओळखपत्र दिले जाणार आहे. तसेच चेस्ट क्रमांक, ओळखपत्र इत्यादी उमेदवार यांचे हातात धरुन त्यांचा फोटो काढण्यांत येईल. सदर ठिकाणी बायोमेट्रीक हजेरी व फेस स्कॅन करण्यांत येईल.चेस्ट क्रमांक प्राप्त झाल्यानंतर उमेदवार यांना मैदानी चाचणीसाठी पाठविण्यांत येईल. मैदानी चाचणीमध्ये 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, व गोळा फेक हे तीन प्रकार पुरुष उमेदवार यांचे बाबतीत अवलंबिण्यात येतील. तसेच महिला उमेदवार यांचे बाबतील 1600 मीटरऐवजी 800 मीटर धावणे ही मैदानी चाचणी घेण्यात येईल. मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झालेले गुण बाबत गुण तक्तावर परिक्षकाची स्वाक्षरी तसेच उमेदवाराची स्वाक्षरी घेण्यांत येईल. तसेच उमदेवार प्राप्त झालेले गुण त्याच दिवशी दर्शनी भागात बोर्डवर प्रकाशित करण्यांत येतील.मैदानी चाचणीचे अभिलेख व इतर दस्तऐवज पोलीस मुख्यालय बीड येथे ठेवण्यासाठी स्टॉग रुमची निर्माती करण्यांत आलेली आहे. सदरची स्टॉग रुम पूर्णपणे सीसीटिव्ही निगराणीखाली राहिल. अशी माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी यावेळी दिली.
भरतीदरम्यान असा असणार पोलीस बंदोबस्त
पोलीस भरती मैदानी चाचणी व शारीरिक चाचणीसाठी प्रत्येक इव्हेटसाठी एक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्याची नियुक्ती व त्यासोबत 2 सपोनि-पोउपनि दर्जाचे अधिकारी व आवश्यक अंमलदार यांची नियुक्ती केली गेली आहे. पोलीस भरती प्रक्रिया बंदोबस्तासाठी पोलीस अधीक्षक 1, अपर पोलीस अधीक्षक 1, उपविभागीय पोलीस अधिकारी 4, पोलीस निरीक्षक 10, सपोनि-पोउपनि- 25, पुरुष-महिला पोलीस अंमलदार 175, पोलीस अंमलदार कॅमेरामॅन 25 अशाप्रकारे बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
एसीबीसह गुप्तवार्ता विभागातील अंमलदारही ठेवणार वॉच
पोलीस भरतीची मैदानी चाचणी व पूर्ण पोलीस भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यांत येणार आहे. भरती प्रक्रियेदरम्यान याबाबत सतर्कता बाळगविण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड व गुप्तवार्ता विभाग, बीड येथील अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भरती संदर्भात काही तक्रार असल्यास मैदानी चाचणीचे ग्राउंडवर विविध ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे नाव, पदनाम व संपर्क क्रमांक देण्यात आला आहे.काही तक्रार असल्यास उमेदवार या क्रमांकावर तक्रार करु शकतात असेही यावेळी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी स्पष्ट केले.
कागदपत्रे पडताळणीसाठी नऊ टेबल
कागदपत्रे पडताळणीसाठी कार्यालयीन कर्मचारी यांचे एकूण 9 टेबल तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये एक वरिष्ठ लिपीक व एक कनिष्ठ लिपीक यांची नियुक्ती आहे. त्यांच्यावर पर्यवेक्षण करण्यासाठी एक प्रमुख लिपीकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. भरती कार्यपध्दतीमध्ये दिलेल्या सूचना प्रमाणे कागदपत्र पडताळणी करण्यांत येईल. कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवार यांना चेस्ट नंबर वाटप करणेसाठी चेस्ट नंबर टेबलला पाठविण्यात येईल.
Leave a comment