महाराष्ट्र ग्रामीण बँकेसह डीसीसी,एसबीआयचे चांगले काम
बीड । सुशील देशमुख
बीड जिल्ह्यात खरीप हंगामात पेरणीसाठी शेतकर्यांना अडचण येवू नये यासाठी जिल्हा अग्रणी बँकेकडून सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीयकृत सरकारी आणि खासगी बँकासह डीसीसी बँकेला 1 हजार 707 कोटींचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 12 जून अखेरपर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकाच्या जिल्ह्यातील 74 शाखांमधून 177 कोटी 2 लक्ष तसेच खासगी क्षेत्रातील राष्ट्रीयकृत बँकाच्या 27 शाखांमधून 11 कोटी 8 लक्ष रुपयांचे कर्ज वितरित केले आहे.याबरोबरच महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या 51 शाखांनी सर्वाधिक 254 कोटी 87 लक्ष रुपयांचे पीक कर्ज दिले आहे. तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 57 शाखांमधून 12 जूनअखेरपर्यंत 30 कोटी 2 लाखांचे पीककर्ज वितरित करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र 7 लाख 85 हजार 786 इतके आहे. मागील बारा दिवसात जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत 112 मि.मी.पाऊस झाला आहे. वेळेवर मान्सून दाखल झाल्याने शेतकरी पेरणीसाठी आतूर झालेला आहे.कापसाचे सरासरी क्षेत्र 3 लाख 55 हजार 494 हेक्टर आहे. यापैकी 31 हजार 820 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली असून ती सर्वसाधारण क्षेत्राच्या 9 टक्के आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र 2 लाख 26 हजार 234 हेक्टर आहे. यापैकी 5 हजार 440 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याशिवाय बाजरी, तूर, मूग, उडीद, मका या पिकांचीही पेरणी आता सुरु होत आहे. याच पार्श्वभूमीवर अधिकाधिक शेतकर्यांना पात्र निकषानुसार बँकाकडून पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरु करण्याच्या सूचना अग्रणी बँकेकडून जिल्ह्यातील सर्व बँकांना दिलेल्या आहेत.
सध्या जिल्ह्यात 5 टक्के क्षेत्रावर म्हणजेच 11 तालुक्यातील 38 हजार 596 हेक्टर क्षेत्रावर शेतकर्यांनी खरिप पीकांची पेरणी आणि कापसाची लागवड केली आहे. दरवर्षी बँकाकडून पीक कर्जाचे उद्दिष्ट गाठण्यास उदासिनता दाखवली जाते असा आरोप होतो,मात्र दिलेले उद्दिष्ट विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचनाही सर्व बँक व्यवस्थापकांना दिल्या असून शेतकर्यांना सुलभ पध्दतीने पीक कर्ज मिळणे आवश्यक असल्याचे शेतकरी सांगतात. केवळ कागदी मेळ लावून पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांनी पुर्ण करु नये, प्रत्यक्षात अडल्या-नडलेल्या शेतकर्याला पीककर्ज तात्काळ मिळावे अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. 12 जूनअखेरपर्यंत जिल्ह्यातील 46 हजार 423 शेतकर्यांना 473 कोटी 17 लक्ष रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. हे प्रमाण उद्दिष्टाच्या तुलनेत 28 टक्के इतके आहे असे अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजेंन्दु झा यांनी ‘लोकप्रश्न’शी बोलताना सांगितले.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेसह डीसीसी, एसबीआयचे चांगले काम
बीड जिल्ह्यात शेतकरी पीककर्जाची कामे वेळेत करण्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने भर दिल्याचे दिसून येते. एसबीआयने आपल्या 48 शाखांच्या माध्यमातून 11 हजार 237 शेतकर्यांना 131 कोटी 16 लाख रुपयांचे पीककर्ज वितरित केले आहे. तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेनेही यापुढे जात तूर्तास जिल्ह्यात सर्वाधिक 25 हजार 621 शेतकर्यांना 254 कोटी 87 लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. याशिवाय डीसीसी बँकेने 5 हजार 489 शेतकर्यांना 30 कोटी 20 लाखांचे पीककर्ज दिले आहे.
Leave a comment