गेवराईत आ.पवार, अमरसिंह पंडीतांचे लोकांनी ऐकले नाही!
आष्टी-पाटोदा-शिरुरमध्ये आ.धस,आ.आजबे अन् माजी आ.धोंडेंनाही मोठी लीड देता आली नाही
परळीचा गड राखला मात्र सोनवणेंनाही 66 हजारांहून अधिकचे मताधिक्य
माजलगाव काठावर पास ; जरांगे फॅक्टरकामी
मराठा,ओबीसीतील संघर्षामुळे बजरंग सोनवणे ठरले जॉयंट किलर
बीड । वार्ताहर
लोकसभा निवडणूकीच्या प्रचारात बीडमध्ये मराठा विरुध्द ओबीसी असा जातीय संघर्ष तसेच सरकारविरुध्द असलेला जनतेचा रोष इनकॅश करण्यात मविआचे उमेदवार बजरंग सोनवणे यशस्वी ठरले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेचे आंदोलन, त्यानंतर मराठा मतांमध्ये पडलेली फुट याचा मोठा फटका भाजप आणि पर्यायाने पंकजा मुंडे यांना बसला. त्यामुळेच त्यांचा मतमोजणीच्या32 व्या फेरीअखेरपर्यंत सुरु असलेला विजयाचा प्रवास थांबला अन् 33 व्या फेरीअखेर बजरंग सोनवणे हे 6553 मतांनी विजयी झाले. मात्र पंकजा मुंडे ही निवडणूक का हरल्या? या प्रश्नाची उत्तरेही सोनवणेंना विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या मताधिक्यातून मिळाली आहेत. भाजप-महायुतीच्या मंत्री, आमदारांचेही लोकांनी ऐकले नाही. त्यामुळेच पंकजा मुंडेंचा निसटता पराभव झाला हे सरळसाधे सार या निवडणूकीच्या अंतिम निकालातून दिसून आले आहे.जरांगे फॅक्टर कामी आला. तसेच मराठा,ओबीसीतील संघर्षामुळे बजरंग सोनवणे हे ‘जॉयंट किलर’ ठरले.
बीड लोकसभेच्या निवडणूकीत भाजपाला मोठे यश मिळेल असा विश्वास महायुतीच्या सर्वच नेते आणि पदाधिकारी-कार्यकर्त्यांना होता. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, छत्रपती उदयनराजे भोसले, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री धनंजय मुंडे या सार्या नेत्यांनी पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी जिल्ह्यात सभा घेत त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले होते. याशिवाय स्वत: पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांना सोबत घेवून सहाही मतदारसंघ पिंजून काढत दीड महिना प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रचार करत निवडून देण्याचे आवाहन केले होते. बीड जिल्ह्यासाठी अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय, रोजगारासाठी मोठा प्रकल्प.जिल्ह्यात रेल्वे आणणार अशी मोठी आश्वासने देतानाच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार असल्याची ग्वाही पंकजा मुंडेंनी प्रचारातून दिली होती. मात्र या सर्व मुद्याला बाजूला ठेवत मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडणूकीत जरांगे फॅक्टर तसेच मराठा,ओबीसीतील संघर्ष हे मुद्दे प्रभावी ठरल्याचे दिसून आले. एकगठ्ठा मतदान वळणे काय असते याची प्रचिती या निवडणूकीत भाजपाला आली.
बीड मतदार संघात विद्यमान भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह इतर भाजप पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे दोन्ही जिल्हाप्रमुखाचे प्राबल्य किती कमी आहे, हे दिसून आले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह माजी आ.सय्यद सलीम, माजी मंत्री प्रा.सुरेश नवले यांनी केलेले काम सोनवणेंचे मताधिक्य वाढवणारे ठरले. सोनवणेंना जिल्ह्यात सर्वाधिक 62 हजार 312 इतके मताधिक्य बीड विधानसभा मतदार संघात मिळाले आहे. महत्वाचे हे की, स्वत:बजरंग सोनवणेंना त्यांचे ‘होमपीच’ असलेल्या केज मतदारसंघात सर्वात कमी 13 हजार 798 मताधिक्य आहे. गेवराई मतदार संघात भाजपाचे विद्यमान आ.लक्ष्मण पवार तसेच राष्ट्रवादीचे माजी आ.अमरसिंह पंडीत यांचे प्राबल्य असतानाही जनतेने मात्र बजरंग सोनवणेंच्या पारड्यात मतांचे दान टाकले आहे. गेवराईत सोनवणेंना तब्बल 39 हजार 96 मतांची आघाडी मिळाली आहे. माजलगाव मतदार संघात चमत्कारिकरित्या पंकजा मुंडेंना केवळ 935 मताधिक्य मिळाले आहे, ज्याची हमी भाजप नेतृत्वालाही नसावी.
आष्टी-पाटोदा-शिरुर मतदारसंघात भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थेचे आ.सुरेश धस, अजित पवार गटाचे आ.बाळासाहेब आजबे व भाजपचे माजी आ.भीमराव धोंडे यांची एकगठ्ठा मते आहेत. मात्र त्यांना मानणार्या मतदारांनीही पंकजा मुंडेंना फार मोठे मतदान केले असा अर्थ काढता येत नाही. कारण दोन आमदार अन् एक माजी आमदार सोबत असतानाही पंकजा मुंडेंना केवळ 32 हजार 254 इतकेच मताधिक्य मिळाले आहे. याच मतदारसंघात महायुतीने आणखी ताकद लावली असती तर किमान 8-10 हजार मताधिक्य नक्की वाढले असते,पण तसे करण्यात आ.धस, आ.आजबे अपयशी ठरल्याच्या प्रतिक्रिया महायुतीच्या कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहेत. पंकजा मुंडे यांना परळी, आष्टी-पाटोदा-शिरुर व माजलगाव या तीन विधानसभा मतदारसंघात 1 लाख 8 हजार 023 इतके मताधिक्य मिळवता आले तर बजरंग सोनवणे यांना बीड, गेवराई व केज मतदारसंघात मिळून 1 लाख 15 हजार 206 इतके मताधिक्य मिळाले आहे. 32 व्या फेरीत बजरंग सोनवणे यांच्याकडून 6 हजार 553 मतांनी पंकजा मुंडे पराभूत झाल्या.
युवा नेते, नगरसेवकांची टिमही अपयशी
जिल्ह्यात शहरी भागात महायुतीच्या नेत्यांनी युवा नेते, नगरसेवक, नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असणार्या कार्यकर्ते,पदाधिकार्यांनाही पंकजा मुंडेंच्या प्रचाराची धूरा सोपवली होती. मात्र या युवा नेत्यांनी घेतलेल्या कॉर्नर बैठका, मेळावे, अन् डोअर टू डोअर केलेला प्रचार हे सर्व मुद्े मराठा व ओबीसी संघर्षाच्या मुद्यापुढे सपशेल अपयशी ठरल्याचे निकालातून दिसून येत आहे.
मराठवाड्यात महायुतीने सात जागा गमवल्या
मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिल्यानंतरही सगेसोयर्याच्या मुद्यावरुन भाजपला मराठवाड्यात मोठा फटका बसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरचे शिंदे गटाचे मंत्री संदीपान भामरे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. इतर 7 जागा मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्या आहेत. हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
2019 मध्ये असा होता निकाल
सन 2019 च्या लोकसभा निवडणूकीत बीडमध्ये भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना 6 लाख 78 हजार 175 मते तर बजरंग सोनवणे यांना 5 लाख 9 हजार 108 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे विष्णू जाधव हे 91 हजार 972 मते घेऊन तिसर्या क्रमांकावर राहिले. या मतदारसंघात 36 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.
भाजपाचा बालेकिल्ला राष्ट्रवादीच्या स्वाधीन!
वीस वर्षांच्या संघर्षानंतर राष्ट्रवादीला मिळाला बीडमध्ये खासदार!
बीड लोकसभा मतदार संघात मागील 20 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत. दिवगंत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी 2004 मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवत विजय संपादन केला होता. नंतर 2009 व 2014 मध्ये त्यांनीच बीडचे प्रतिनिधीत्व केले. केंद्रात 2014 मध्ये त्यांना केंद्रीय ग्रामविकास मंत्रीपद मिळाले होते,मात्र ते मोजक्या काही दिवसांचे ठरले होेते. मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणूकीत डॉ.प्रितम मुंडे निवडून आल्या. तसेच 2019 च्या निवडणूकीतही त्यांनी विजय मिळवला होता. यावेळी मात्र भाजपने खा.डॉ.प्रितम मुंडे ऐवजी पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली. मात्र या अटीतटीच्या लढतीत भाजपाचा बीडचा बालेकिल्ला राष्ट्रवादी काँग्रेसकडे जनतेने स्वाधीन केला. शिवाय 2004 नंतर तब्बल 20 वर्षांनी आता बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार निवडून आला आहे. 2004 मध्ये जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपचे उमेदवार प्रकाश सोळंके यांचा पराभव केला होता.
बीड लोकसभेची निवडणूक यंदा अत्यंत अटीतटीची आणि दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसाठी प्रतिष्ठेची ठरली. या निवडणूकीचे वैशिष्ट्य हे की, शरद पवारांचा पक्ष फुटल्यानंतर आणि पक्षातील महत्वाचे नेते अजित पवारांसोबत महायुतीत सहभागी झाल्याने पक्षाची धूरा सांभाळण्यासाठी जेष्ठ व अनुभवी नेत्यांची वाणवा निर्माण झाली. अशा स्थितीतही बीडमधून शरद पवारांनी 2019 नंतर पुन्हा एकदा बजरंग सोनवणेंना तिकिट दिले. त्यांच्यावर विश्वास दाखवला. तो विश्वास सोनवणेंनी प्रचारादरम्यान अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचत विकासाचे मुद्दे मांडत केलेल्या मेहनतीतून आणि राजकीय गणिते जुळवून आणत सार्थ ठरवला आहे.
वास्तविक मागील वीस वर्षांचा बीड जिल्ह्याचा राजकीय आढावा घेतला तर हा लोकसभा मतदार संघ भाजपाच्याच ताब्यात राहिला आहे. सन 2004 ते 2024 या वीस वर्षांच्या कालावधीचा आढावा घेतला तर जिल्ह्यात या काळात लोकसभेच्या चार पंचवार्षिक व एकदा पोटनिवडणूक झाली. चार पंचवार्षिक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला एकदाच यश मिळाले आहे. एकंदरच मागील 20 वर्षातील जिल्हयातील ही राजकीय स्थिती लक्षात घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला जनतेने नाकारलेले दिसते. 4 पंचवार्षिकमध्ये केवळ 1 वेळेसच राष्ट्रवादीला बीड लोकसभेत विजय मिळवता आलेला आहे.मात्र यंदाच्या निवडणूकीदरम्यान राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा कायम राहिला. आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी सग्या-सोयर्यांनाही सरकारने आरक्षण द्यावे अशी मागणी केली होती. अशा स्थितीत ही निवडणूक पार पडली.
यंदाच्या निवडणूकीत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस व एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपसोबत महायुतीत सहभागी असल्याने मताधिक्य मोठ्या प्रमाणात वाढेल असा विश्वास बीड जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांना होता.मात्र निवडणूकीत झालेला प्रचार आणि जातीय संघर्ष यामुळे मतांची विभागणी होत गेली.शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फाटाफुट झालेली असली तरी शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग बीड जिल्ह्यात आहे. कठीण परिस्थितीत बीडमध्ये आ.संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांसोबत राहणे पंसत केले अन् नंतर त्यांनीच बीड मतदारसंघातून बजरंग सोनवणेंना सर्वाधिक 62 हजारांचे निणार्यक मताधिक्य मिळवून दिले. सारे नेते विरोधात असतानाही तरुण, उमदा आ.संदीप क्षीरसागर हा शरद पवारांच्या पक्षाचे काम करत राहिला. सोनवणेंच्या यशात आ.संदीप क्षीरसागर व त्यांच्या सर्व सहकार्यांची मोठी मोलाची भूमिका राहिली. इतर पाच मतदार संघात नेते कमी असले तरी जनतेनेचे सोनवणेंची निवडणूक हाती घेत निर्णायक मते देत सोनवणेंना विजय मिळवून दिल्याचे मतांच्या आकडेवारीतून दिसून येत आहे.
Leave a comment