समर्थक ओबीसी समाज अस्वस्थ

बीड । वार्ताहर

राजकारणाच्या पटलावर जे दिसतं ते घडतं नाही आणि जे घडत आहे ते कधी दिसत नसतं. हा खर्‍या राजकारणाचा नियम आहे. त्याचबरोबरच राजकारणात कायम कोणीही कोणाचा मित्र अथवा शत्रू नसतो. या राजकीय समीकरणामध्ये जिल्ह्यातील अनेक राजकीय मंडळी हुबेहूब बसलेली आहेत. अपवाद आहे तो, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा. कुठल्याही राजकीय पक्षात नसल्याने आणि स्वत: मायक्रो मायनॉरिटीमध्ये येत असल्याने नेमकी भूमिका काय घ्यायची? या हिंदोळ्यावर जयदत्त क्षीरसागरांचे राजकारण ‘लोलका’प्रमाणे डोलत आहे. इकडे की तिकडे अशी त्यांची राजकीय अवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत जयदत्त क्षीरसागरांचे तोंडावर बोट असल्याने ते काय करणार? असाच प्रश्न बीडसह जिल्हाभरात प्रत्येकजण विचारत आहे.त्यांना ज्यावेळी विचारणा केली जाते, त्यावेळी पाहू, योग्य निर्णय घेवू असे त्यांच्याकडून ठरलेले उत्तर असते. जिल्ह्यात पंकजा मुंडे विरुध्द बजरंग सोनवणे अशी थेट लढत होत असल्याने जयदत्त क्षीरसागर काय निर्णय घेणार याकडे त्यांच्या समर्थक असलेल्या ओबीसी समाजाचे लक्ष लागलेले असून समाजातील कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत.त्यांचेच समर्थक मराठा कार्यकर्ते मात्र जयदत्त क्षीरसागर जी भूमिका घेतील ती आम्हाला मान्य असेल असे सांगत सावध पवित्रा घेत आहेत.
बीड विधानसभा निवडणूकीत पराभव झाल्यावर ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून जयदत्त क्षीरसागर हे एकला चलो रे च्या भूमिकेत आहेत. बीड विधानसभा मतदार संघ महायुतीमध्ये शिवसेनेकडे अर्थातच एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप क्षीरसागर विद्यमान आमदार आहेत. अजित पवार गटाला बीडची जागा सुटू शकत नाही. भाजपात जायचे तर मराठा-मुस्लिम मतदार काय भूमिका घेतील, शिंदे सेनेत जायचे तर उमेदवारी मिळेल का? अशा चक्रव्युहामध्ये जयदत्त क्षीरसागरांचे राजकारण सापडले आहे. त्यामुळे शांत बसणे हा सर्वात चांगला निर्णय जयदत्त क्षीरसागर यांनी घेतला आहे. बीड मतदार संघावर अद्यापही जयदत्त क्षीरसागर यांचीच पकड आहे. पराभव झाला असला तरी खचून न जाता त्यांनी पुन्हा नव्या उमेदीने लोकसंपर्क कायम ठेवला आहे. इतर कोणत्याही लोकप्रतिनिधीपेक्षा त्यांनाच ग्रामीण भागातील लोक विविध कार्यक्रमासाठी आग्रहाने बोलवतात. त्यांच्यावर बीड शहरासह ग्रामीण भागातील जनतेचा मोठा विश्वास आहे. शब्दाला जागणारा नेता, म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.परंतु राजकीय गदारोळामध्ये ते कुठेही दिसत नसल्यामुळे जयदत्त क्षीरसागरांना मानणारा वर्ग क्षीरसागर नेमकी काय भूमिका घेणार? याकडे लक्ष ठेवून आहेत. गत लोकसभेच्यावेळी त्यांनी ऐनवेळी प्रितम मुंडे यांच्या पारड्यात आपले राजकीय वजन टाकले होते. मेळावा घेवून, कार्यकर्त्यांशी चर्चा करुन त्यांनी त्यावेळी निर्णय घेतला होता. आताची राजकीय परिस्थिती ही संवेदनशील आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे मराठा विरुध्द ओबीसी असे मतांचे धु्रवीकरण झाले आहे. या सार्‍या परिस्थितीत पंकजा मुंडे यांना ओबीसीबरोबरच मराठा मते मिळवून देण्याची किमया जयदत्त क्षीरसागर सहजपणे बीड मतदार संघामध्ये यशस्वी करु शकतात, मात्र त्यांनी हाताची घडी अन् तोंडावर बोट अशी भूमिका घेतल्याने सारेच अस्वस्थ आहेत.


राष्ट्रवादीकडून होती लोकसभेची ऑफर!

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वत: जयदत्त क्षीरसागर यांच्याशी संपर्क करत आपण लोकसभा निवडणूक लढवावी.आम्ही ताकदीने आपल्या पाठीशी राहू असा शब्द दिला होता. मात्र जयदत्त क्षीरसागरांनी ‘मला लोकसभेत इंटरेस्ट नाही’ असे सांगून नम्रपणे जयंत पाटलांची ऑफर टाळली होती. एवढेच नव्हे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्ष प्रवेशासाठी सातत्याने स्वत: प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जेष्ठ नेते छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल या तिघांनीही क्षीरसागरांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आमदार नसताना आणि सत्तेत नसतानाही बीड मतदार संघाच्या विकासासाठी विविध विकास कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने जयदत्त क्षीरसागरांना मदतीचा हात दिलेला आहे. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी तर तद्नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयदत्त क्षीरसागरांना सातत्याने मदत केलेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काय निर्णय घ्यावा असा प्रश्न क्षीरसागरांसमोर आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.