पंकजा मुंडेेंना मताधिक्क देण्यासाठी मराठा कार्ड चालवण्याची रणनिती
बीड । वार्ताहर
मराठा आरक्षण आंदोलनाचे सर्वात जास्त लोण बीड जिल्ह्याच्या गावा-गावात पोहचले आहे. ज्या-ज्यावेळी आंदोलने झाली त्या-त्यावेळी बीड जिल्ह्यातून मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. मराठा क्रांती मोर्चापासून ते थेट अंतरवलीच्या सभेपर्यंत मराठा समाज यामध्ये अग्रभागी होता. आजही जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये आरक्षण आंदोलनाची धग कायम आहे. अशा परिस्थितीमध्ये मराठा मतदान मिळवण्यासाठी महायुतीमध्ये असलेल्या तीनही राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची कसोटी लागणार आहे. यात भाजपाचे राजेंद्र मस्के, शिवसेना शिंदे गटाचे अनिल जगताप, कुंडलिक खांडे, राष्ट्रवादीचे अॅड.राजेश्वर चव्हाण तसेच मनसेचे राजेंद्र मोटे यांच्यापुढे ग्रामीण भागामध्ये जावून समाजाचे मतदान कसे मिळवायचे हा प्रश्न आहे.
लोकसभा निवडणूकीत पंकजा मुंडे विरुध्द बजरंग सोनवणे अशी लढत होणार आहे. त्यामध्ये ओबीसी विरुध्द मराठा असा रंग या निवडणूकीला दिला जात आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाज सध्या एकवटलेला आहे. त्यातही ग्रामीण भागातील कष्टकरी मराठा समाज एकमुखाने जरांगे यांच्या पाठीशी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मराठा मतदान किती प्रमाणात होईल, या बद्दल विद्यमान परिस्थितीमध्ये तर्क-वितर्क लावले जात आहेत. तथापि, अजुन एक महिन्याचा कालावधी मतदानासाठी आहे. राजकारणामध्ये एका दिवसात काहीही निर्णय होतो. त्यामुळे उद्या कदाचित हाच मराठा समाज आरक्षणाचा मुद्दा सत्ताधारी सोडवतील या विषयावर पुन्हा भाजपाच्या पाठीशीही उभा राहू शकतील, अशीही चर्चा होत आहे.
बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला तर जिल्ह्यामध्ये भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी राजकीयदृष्ट्या आणि संख्येने पॉवरफुल आहे. त्या तुलनेत शिंदे सेनेची ताकद बीड मतदार संघ वगळता इतर विधानसभा मतदार संघात कमी आहे. त्यामुळे बीड मतदार संघात पंकजा मुंडेंना मराठा समाजाचे मताधिक्य मिळवून देण्याची सर्वस्वी जबाबदारी एकट्या अनिल जगताप यांच्यावर येवून पडली आहे. भाजपाचे राजेंद्र मस्के हे देखील बीड मतदार संघातच आहेत. परंतु त्यांच्याच पक्षाच्या उमेदवार असल्याने त्यांच्यावर मर्यादा येवून पडल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये मनोज जरांगे यांच्या खांद्याला खांदा लावून तालुक्यातील ग्रामीण भागात अहोरात्र फिरुन संघटन करण्यामध्ये अनिल जगताप यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. आजही ग्रामीण मराठा समाज त्यांच्याकडे उद्याचा आमदार म्हणून पाहत आहे. या पार्श्वभूमीवर अनिल जगताप यांची लोकसभा निवडणूकीत जबाबदारी नक्कीच वाढली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी कोणाला पाडायचे ते पाडा, असे फर्मान सोडलेले आहे. अशा परिस्थितीत अनिल जगताप यांच्यासह राजेंद्र मस्के यांची बीडमध्ये कसोटी लागणार आहे. तर अॅड.राजेश्वर चव्हाण, सचिन मुळूक यांनाही ग्रामीण भागात मराठा समाजाकडे जाताना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. आपल्या समाजाचे मतदान पंकजाताई मुंडे यांना मिळवून देण्यासाठी या चौघांचीही कसोटी लागणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांची जबाबदारी आहे, त्यांना तर गावा-गावात जावेच लागेल, परंतु पक्षाचे पदाधिकारी म्हणून आमदारांनंतर त्या-त्या तालुक्यात या चोैघांची मोठी जबाबदारी आहे.

बीडमध्ये अनिल जगताप यांच्यावर खरी भिस्त
बीड मतदार संघामध्ये मराठा समाजाचे मतदान मिळवण्यासाठी पंकजा मुंडे यांना खर्या अर्थाने फायदा होणार आहे तो अनिल जगताप यांचा. जवळपास 15 वर्षांपासून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ते कार्यरत आहेत. मितभाषी स्वभाव असल्याने सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून त्यांनी आपले राजकारण पुढे नेले आहे. मधल्या काळात त्यांनी उध्दव ठाकरेंची शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. बीड तालुक्यातील काही प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सत्तेच्या माध्यमातून प्रयत्नही केले. ठाकरेंची शिवसेना असो की, शिंदेची; अनिल जगतापांमध्ये फारसा बदल झाला नाही. कायम लोकसंपर्कात असल्यामुळे त्यांचा या निवडणूकीत मुंडेंना नक्कीच फायदा होणार आहे, आणि त्यांच्यावरच पंकजा मुंडेंची खरी भिस्त आहे.
Leave a comment