अंडर 19-विश्वचषकासाठी आज भारत-ऑस्ट्रेलियात थरार

बीड । वार्ताहर

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारताचा आक्रमक फलंदाज आणि बीडचा भूमिपुत्र सचिन धसने आपल्या खेळीने देशभरातील क्रिकेटप्रेमींचे प्रेम मिळवले आहे. आज रविवारी (दि.11) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण देशभराचे लक्ष लागले असून बीडच्या या तंत्रशुध्द फलंदाजीचे दर्शन घडवत संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणार्‍या सचिनच्या आज खेळीकडे संपूर्ण बीड जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींचेही लक्ष लागले आहे. आपला सचिन आज कमाल करणार.. अशा भावना क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत.

 

 

19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात उपांत्य सामन्यात भारताचा संघ अडचणीत असताना सचिन धसने वेगवान 96 धावा करत संघाला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे तो चर्चेत आला.अगदी वयाच्या चौथ्या वर्षापासून क्रिकेट खेळणार्‍या बीडच्या सचिनचे आता सर्वत्र कौतूक होत आहे.सचिनचे वडिल संजय धस हे आरोग्य विभागात तर आई सुरेखा धस या बीड येथे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. सचिनच्या शानदार क्रिकेटखेळीचे त्यांनाही खूप आनंद आणि समाधान आहे. सचिन हा बीड येथील क्रिकेट प्रशिक्षक अजहर शेख यांच्याकडे प्रशिक्षण घेतो. तसेच आदर्श क्रिकेट क्लबमध्ये सराव करतो. यापूर्वी वयाच्या दहाव्या वर्षी त्याने प्रचंड कष्टाने 12 वर्षाखालील क्रिकेट संघात स्थान पक्के केले होते.त्यानंतर आता तो 19 वर्षाखालील क्रिकेट संघात देशाचे नाव रोशन करत आहे. आज रविवारी (दि.11) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण देशभराचे लक्ष लागले आहे.

 

सचिनचे बीडकरांना कौतूक

 

क्रिकेट विश्वात बीडचे नाव अभिमानाने पुढे आणणार्‍या सचिन धसचे बीडकरांना खूप अप्रुप आहे. आपल्या मातीतला हा खेळाडू 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात खेळतांना विश्वचषक मालिकेत तुफानी आणि निर्णायक खेळी करुन संघाला विजय मिळवून देताना सर्वांनी पाहिला. आज विश्वचषकाचा अंतिम सामना होत असताना सचिनच्या फलंदाजीला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

आज बीडमध्ये फायनलचे थेट प्रक्षेपण

आज रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंडर 19 विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे. हा सामना बीडमधील क्रिकेटप्रेमींना मोठ्या स्क्रीनवर पाहता यावा यासाठी श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरील बॅडमिंटन हॉलमध्ये दुपारी 1 वाजेपासून विश्वचषक अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपणचे नियोजन करण्यात आले आहे.यासोबतच सचिनचे वडील संजय धस यांचे मित्र व क्रिकेटप्रेमी गिरीश बीजलवाड यांनी त्यांच्या बीड शहरातील बार्शी रोडवरील सह्याद्री हॉटेलच्या बाजूला रिजेन्सी पार्क अपार्टमेंटमध्ये मोठ्या स्क्रीनचे नियोजन केले आहे.तसेच संतोषी माता टॉकीजच्या स्क्रिनवर बीडकर हा सामना पाहणार आहेत. सर्व क्रिकेटप्रेमी तसेच मास्टरब्लास्टर सचिन धस याच्यावर प्रेम करणार्‍यांनी याचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आला आहे.
 

चौथ्या वर्षापासून क्रिकेटचे धडे

महाराष्ट्राच्या बीडमध्ये संजय धस आणि सुरेखा धस दाम्पत्याच्या घरी 3 फेब्रुवारी 2005 रोजी सचिनचा जन्म झाला. सचिनला समीक्षा नावाची मोठी बहीण आहे. त्या सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत.

सचिनचे वडील संजय धस हे आरोग्य विभागात नोकरी करत असून बीडमध्येच नियुक्त आहेत. जन्माच्या आधीपासूनच सचिनला क्रिकेटपटू बनवण्याचं स्वप्नं पाहलं होतं, असं संजय धस यांनी बोलताना सांगितलं.

तर सचिनची आई म्हणजे सुरेखा धस या महाराष्ट्र पोलीस खात्यात सहायक पोलीस निरक्षक (API) पदावर कार्यरत आहेत. सध्या बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांची नियुक्ती आहे.

वयाच्या चौथ्या वर्षापासून संजय धस यांनी सचिनच्या क्रिकेट प्रशिक्षणाची सुरुवात केली होती. बीडमधील प्रशिक्षक शेख अझहर यांच्याकडूनच सचिननं क्रिकेटचे धडे गिरवले आहेत.

सचिन धस

 

सचिन आजपर्यंत क्रिकेटमध्ये जे काही शिकला ते सर्व अझहर सरांकडूनच शिकला. त्यामुळं त्याच्या कारकिर्दीमध्ये शेख अझहर सरांचाही मोठा वाटा असल्याचं, त्याचे वडील संजय धस म्हणाले.

सचिनच्या इतर आवडीनिवडींचा विचार करता त्याला गाणी ऐकयला, चित्रपट पाहायला आणि त्यातही साऊथचे चित्रपट पाहायला खूप आवडतं, असं त्याचे वडील म्हणाले.

क्रिकेट खेळायला होता आईचा विरोध

सचिन लहानपणापासूनच क्रिकेट खेळत असला तरी तो अभ्यासातही कायम हुशार होता. त्यामुळं त्यानं शिक्षण पूर्ण करून चांगल्या क्षेत्रात करिअर घडवावं अशी त्याच्या आईची इच्छा होती.

त्यासाठीच सचिननं क्रिकेट खेळू नये असं त्याच्या आई सुरेखा धस यांचं स्पष्ट मत होतं. दुसरीकडं सचिनच्या वडिलांनी मात्र जन्माच्या आधीच सचिनला क्रिकेटपटू बनवायचं ठरवलं होतं.

सचिन लहानपणी सरावासाठी तयार होताना.

 

"मुलगा शिक्षणात चांगला आहे, त्याचं नुकसान करू नका, परत विचार करा असं सचिनची आई मला म्हणायची. या विषयावरून अनेकदा आमचे वादही व्हायचे. पण मी ठाम होतो. त्याचा खेळ पाहून तो नक्कीच काहीतरी करून दाखवू शकतो याची मला खात्री होती," असं  धस म्हणाले.

त्याचबरोबर, समजा क्रिकेटमध्ये सचिनला फार मोठी कामगिरी करता आलीच नाही. तरी क्रिकेटमुळं त्याच्या जीवनाला एक प्रकारची शिस्त लागेल आणि त्याचं काही नुकसान होणार नाही, याची खात्री होती, असंही संजय यांनी सांगितलं.

सचिन आणि सचिनचं कनेक्शन!

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे क्रिकेटचा देव म्हणून स्थान मिळवलेला सचिन तेंडुलकर आणि जणू हे नाव मिळाल्यानं पावन झालेला सचिन धस या दोघांमध्येही एक खास कनेक्शन आहे.

या दोघांमध्ये असलेलं सर्वात महत्त्वाचं कनेक्शन म्हणजे दोघंही महाराष्ट्राच्या मराठी मातीतले खेळाडू आहेत. त्यामुळं महाराष्ट्रासाठी ही मराठी अस्मिता नक्कीच आहे.

पण आणखी एक महत्त्वाचं कनेक्शन आहे. सचिनचे वडील म्हणजे संजय धस हे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे प्रचंड मोठे फॅन आहेत. त्यामुळं मुलगा झाला तेव्हा मुलाला सचिनचं नाव दिलं, 

सचिन धस

 

सचिन तेंडुलकरच्या नावावर नाव ठेवलं असलं तरी त्या नावाला साजेशी कामगिरी करण्याची वाट सगळे पाहत होते. सचिननं नेपाळ विरोधात शतकी खेळी केली होती. पण दक्षिण आफ्रिकेच्या विरोधातील खेळीमुळं खऱ्या अर्थानं सचिनचं कौतुक झालं.

"सचिन या नावातच एवढी शक्ती आहे की, जणू त्यांचा आशीर्वाद या नावाच्या रुपानं सचिनला मिळाला आणि त्यामुळं तो ही कामगिरी करू शकला,"

एका शॉटसाठी.......

प्रशिक्षक शेख अझहर यांनी सचिन प्रचंड शिस्तप्रिय असून तो कधीही सरावात आढेवेढे घेत नसल्याचं सांगितलं. लहानपणापासूनच त्यांनं कधीच कंटाळा केला नाही, असं ते म्हणाले.

"वयाच्या चौथ्या वर्षापासून सचिन सराव करत आहे. कॅम्पसाठी बाहेर जाणं सोडलं तर त्यानं पूर्णवेळ बीडमध्येच सराव केला आहे. न थकता रोज सहा ते सात तास सराव करूनही तो मागे हटत नव्हता. सरावाचा अखेरचा चेंडू खेळल्यानंतर तो थकून खाली पडायचा, पण कधीही नकार दिला नाही," असं अझहर यांनी सांगितलं.

"अझहर यांच्या मते, क्रिकेटमध्ये यश मिळवण्यासाठी बेसिक किंवा तंत्रशुद्ध क्रिकेट अत्यंत महत्त्वाचं आहे. आडवे-तिडवे फटके मारून फायदा होत नाही. त्यामुळे सचिनला सुरुवातीपासूनच बेसिक क्रिकेट खेळायला सांगितलं आणि त्यानंही तेच केलं," असं ते म्हणाले.

सचिन धस

 

एक-एक शॉट अगदी बिनचूकपणे परफेक्टपणे खेळता यावा म्हणून हजार-हजार चेंडू टाकून त्या शॉटचा सराव सचिनकडून करून घेतला. त्यामुळंच त्याला चांगले फटके मारूनही आक्रमक फलंदाजी करणं शक्य होत,असल्याचं शेख अझहर यांनी सांगितलं.

सचिन 12 वर्षांचा असताना त्याला काही कारणांमुळं अंडर 14 च्या संघात संधी मिळाली नाही. त्यावेळी तो खूप नाराज झाला आणि एकटा पुण्याहून बीडला आला. पण त्यानंतर त्यानं मनावर घेतलं आणि प्रचंड सराव करत कामगिरी करून दाखवली. त्यानंतर त्यानं मागं वळून पाहिलंच नाही, असंही त्याचे कोच शेख अझहर म्हणाले.

षटकार पाहून रेफरींनी तपासली बॅट

सचिन फलंदाजी करताना त्याचं तंत्र चांगलं असल्याचं पाहायला मिळतं. पण त्याचबरोबर तो मैदानावर मोठे फटके मारण्यासाठीही तो ओळखला जातो. त्याचे षटकार तर चांगलेच उत्तुंग असतात, आणि संधी मिळाली की तो षटकार खेचतो, असं त्याचे प्रशिक्षक शेख अझहर म्हणाले.

एकदा अंडर 16 स्पर्धेत खेळत असताना एका सामन्यात सचिननं गोलंदाजांची प्रचंड धुलाई केली होती. त्या सामन्यात सचिननं अनेक उत्तुंग षटकार खेचत शतकी खेळी केली होती.

त्यावेळी सचिनची शरीरयष्टी फारशी मजबूत नव्हती. त्यामुळं हा एवढे उत्तुंग षटाकार कसे खेचू शकतो अशी शंका रेफरींना आली. त्यामुळं रेफरींनी येऊन त्याची बॅटही नियमानुसार योग्य आहे का, हे तपासलं होतं, असं संजय धस यांनी सांगितलं.

सचिन धस

 

वडिलांना तयार करून घेतले टर्फ पीच

सचिनचा अंडर 14 स्पर्धेतला खेळ पाहून स्पर्धेच्या प्रशिक्षकांनी सचिनला चांगल्या शहरात खेळण्याचा सल्ला दिला होता. सचिन टर्फवर खेळला तर तो पुढं जाऊ शकेल असं प्रशिक्षकांनी सचिनच्या वडिलांना सांगितलं होतं.

त्यानंतर संजय धस यांनी मनावर घेतलं आणि तातडीनं बीड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून टर्फ विकेट तयार करून घेतल्या होत्या.

टर्फ विकेटसाठी पाणीही मोठ्या प्रमाणात लागतं. पण बीडमध्ये पाण्याचा प्रचंड तुटवडा. पण मुलाचा सराव थांबता कामा नये म्हणून, संजय धस स्वतः प्रयत्न करून क्रिकेट संघटनेच्या मदतीनं सर्व अडचणींवर मात करत होते.

केदार जाधवने दिली संधी

महाराष्ट्र प्रिमियर लीगमधील अनुभवानं सचिनच्या जीवनात मोठा बदल झाल्याचं त्याचे वडील संजय सांगतात. या स्पर्धेत कोल्हापूर टस्कर्स संघाचा कर्णधार आणि माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवनं सचिनला संघात संधी दिली.

केदार जाधव आणि अंकित बावणे या दोन वरिष्ठ खेळाडूंबरोबर ड्रेसिंग रूम शेअर करायला मिळाल्याचा सचिनच्या करिअरमध्ये मोठा फायदा झाल्याचं त्याचे वडील म्हणाले.

सचिन धस

 

"सचिननं दीड महिना या संघाबरोबर आणि प्रामुख्यानं वरिष्ठांबरोबर सराव केला. त्यांनी त्याला एवढा आत्मविश्वास दिला की, त्यानंतर सगळं काही बदलून गेलं. सचिनला त्यामुळं खूप मदत झाली," असं संजय यांनी सांगितलं.

अंडर 19 स्पर्धेत सचिन सुरुवातीला चार सामन्यांत संघाच्या गरजेनुसार खेळला. त्याला अखेरच्या ओव्हरमध्ये संधी मिळत होती म्हणून तो फटके मारत होता. पण तरीही तो खेळावर समाधानी होता. नंतर नेपाळविरोधात वर खेळायची संधी मिळाली आणि त्यानं संधीचं त्यानं सोनं केलं, 

सचिननं अशीच कामगिरी करत अंडर 19 चा वर्ल्ड कप देशाला जिंकून द्यावा आणि लवकरात लवकर भारतीय संघात स्थान मिळवत देशाचं प्रतिनिधित्व करावं एवंढीच अपेक्षा असल्याचं सचिनचे वडील संजय धस म्हणाले.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.