बाल संशोधकांचा सर्वाधिक सहभाग
बीड / वार्ताहार
बीड येथील गुरुकुल इंग्लिश स्कूल मध्ये संपन्न झालेले यावर्षीचे विज्ञान प्रदर्शन बाल वैज्ञानिकांच्या चिकित्सक सृजनशील संशोधकवृत्तीच्या नाविन्यपूर्ण अविष्कारामुळे अधिकच प्रभावी ठरले. तीनशेहुन अधिक विद्यार्थी या प्रदर्शनात आपल्या वैविद्यपूर्ण प्रयोगासह सहभागी झाले. यावर्षी गुरुकुलच्या स्थापनेला वीस वर्ष पूर्ण होत असल्याने मागील तीन महिन्यापासून विद्यार्थी, पालक आणि सर्व शिक्षक हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत होते . बीडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय पांडकर, पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य गणेश काकडे आणि गुरुकुलचे कार्यकारी संचालक अखिलेश ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विज्ञान प्रदर्शनाचे उद्धघाटन संपन्न झाले.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. विनिता ढाकणे, प्राचार्य मनोज सर्वज्ञ, उपप्राचार्य अमोल कपूर, शेख सायरा आदीची प्रमुख उपस्थिती होती. सावित्रीबाई फुले शिक्षण संस्था आणि गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या स्थापनेला यंदा वीस वर्ष पूर्ण होत आहेत.त्या अनुषंगाने चालू शैक्षणिक वर्षात संस्थेने विविध शैक्षणिक उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच भाग म्हणून यावर्षीचे विज्ञान प्रदर्शन भव्य आणि लक्षवेधी करण्यासाठी गुरुकुलचा विज्ञान विभाग मागील तीन महिन्यापासून परिश्रम घेत होता . इयत्ता पहिली ते दहावीच्या एकूण तीनशेहून अधिक बाल संशोधक या प्रदर्शनात सहभागी झाले होते. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने थीम आणि विषयानुसार या प्रदर्शनाची वर्गवारी करण्यात आली होती. आपला प्रयोग इतरांपेक्षा वेगळा कसा असावा आणि उपस्थित पालकांना आणि प्रेक्षकांना विश्लेषण करून कसा मांडता येईल याची पूर्ण तयारी सर्व विज्ञान विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडुन करून घेतल्याचे पहावयास मिळाले. एकूण सात ते आठ डिजिटल प्रात्यक्षिक शो च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रयोग यंदाचे आकर्षण ठरले. यात चांद्रयान 3 मोहीमेचा उभा केलेला नेत्रदीपक भव्य सेट उपस्थित पालकांच्या मनाचा वेध घेणारा ठरला. रोव्हर, लँडर, लॉन्चर, स्पेस स्टेशन आदी साधनाची हुबेहूब केलेली प्रतिकृती प्रत्यक्ष भास निर्माण करत होती . तसेच सुनामीच्या नैसर्गिक आपत्तीत समुद्राच्या महाकाय उसळण्याऱ्या लाटांना कशा पद्धतीने नियंत्रित करता येईल याचा प्रात्यक्षिक स्वरूपातील प्रयोग देखील तितकाच प्रभावी आणि कौतकास्पद झाला.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून अंधविश्वासावर मात या शो मध्ये विविध वैज्ञानिक प्रयोग यांच्याद्वारे भोंदूगिरी कशा पद्धतीने केले जाते यावर प्रकाश टाकणारे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी केले. न्यूटनच्या सिद्धांतच्या नुसार वायूमंदडलीय दाब आणि गुरुत्वाकर्षण आदी बाबत विद्यार्थी मित्रांनी केलेला अभ्यासपूर्ण प्रयोग पालकांच्या पसंतीस उतरला.हायटेक स्मार्ट सिटी, सूर्ययान, स्पेस स्टेशन, स्वयंचलित बेरियर, थ्रीडी हॅलोग्राम आदी प्रयोग देखील तितेकच प्रभावी व वैविद्यपूर्ण झाले. या वर्षी बालसंशोधकांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेवून आपली संशोधकवृत्ती या निमित्ताने प्रदर्शित केली हे विशेष, वायू प्रदूषण,पाणी संवर्धन, सूर्यमाला आदी विषयावर अनेक प्रयोग या प्रदर्शनात पहावयास मिळाले. गुरुकुलचे विज्ञान प्रमुख शेख अजीम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व विज्ञान शिक्षक, सर्व विभाग प्रमुख, सहकारी सर्व शिक्षक यांच्या अथक परिश्रमामुळे हे प्रदर्शन यशस्वी झाले.
Leave a comment