पत्रकार शामसुंदर सोन्नर यांनी कीर्तनातून मांडले शेतकर्यांचे वास्तव
बीड । सुशील देशमुख
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एरवी, धरणे, उपोषण, ठिय्या, मोर्चा अशी आंदोलने पहायला मिळतात. सोमवारी (दि.13) मात्र या ठिकाणी वेगळेच आंदोलन पहावयास मिळाले. चक्क आंदोलनाच्या कट्ट्यावर शेतकर्यांचे प्रश्न मांडणारे जेष्ठ पत्रकार शामसुंदर सोन्नर महाराजांचे सांप्रदायिक कीर्तन संपन्न झाले. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असे ‘कीर्तन आंदोलन’ बहुधा पहिलेच असावे. महाराजांनी कीर्तनातून संत तुकाराम महाराजांच्या ‘मढे झांकुनिया करिती पेरणी,कुणबियांचे वाणी लवला हो,जयासी फावले नरदेह’या अभंगाचे निरुपण केले.
यावेळी सोन्नर महाराज यांनी सांप्रदायिक कीर्तनातून विविध उदाहरणे देवून त्यांनी शेतकर्यांच्या व्यथा मांडल्या. शोरुममधील वाहनांच्या किंमती दरवर्षी वाढतात, पण शेतकर्यांच्या शेतमालाचे भाव का वाढत नाहीत. नुसता कांद्याचा भाव वाढला तर लगेच त्याची चर्चा सुरु का होते? असा सवाल त्यांनी केला.यावेळी त्यांनी सामाजिक परिस्थितीचे वास्तव मांडतांनाच उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे उत्तरोत्तर हे कीर्तन चांगलेच रंगत गेले.
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून राज्य सरकार अजूनही झोपेतच आहे. शासनाने दुष्काळ निवारणासाठी योग्य त्या उपाययोजना तात्काळ आखाव्यात, गुरांच्या चार्यासाठी गावोगावी चारा डेपो सुरू करावा, सर्वच पिकांना विमा द्यावा यासह इतर मागण्यांसाठी 13 नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी दिंडी काढण्यात आली.या दिंडीमध्ये अनेक शेतकर्यांचा सहभाग होता. टाळमृदंगाच्या गजरात घोषणाबाजी करत शेतकरी दिंडीत सहभागी झाले होते. पुढे या दिंडीचे रुपांतर सांप्रदायिक कीर्तनात झाले. यावेळी अॅड.अजय बुरांडे यांच्यासह किसान सभेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सोन्नर महाराज म्हणाले, शेतकर्यांचे सोयाबीन तीन-तीन वर्ष घरात पडून आहे. शेतकर्यांना वाटते भाव वाढेल पण दुसरे सोयाबीन आले तरी भाव वाढत नाहीत हे दुर्देव आहे. सरकारच्या आयात-निर्यात धोरणामुळे शेतकर्यांचे नुकसान होताना दिसते. सध्या बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शासनाने सर्वच पिकांना विमा देण्यात यावा, पुनर्गठन करण्याऐवजी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा. गुरांच्या चार्यासाठी गावोगावी चारा डेपो सुरू करण्यात यावा. दुष्काळात तग धरून राहण्यासाठी तगाई म्हणून शेतमजुरांना दरमहा आर्थिक मदत देण्यात यावी, सोयाबीन, कापसासारख्या पिकांवर उत्पादन खर्चाच्या दिडपट हमीभाव देऊन त्यांची शासकीय खरेदी करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी दिंडी काढण्यात आली .‘ईडा पिडा टळो बळीचे राज्य येवो’ ‘शेतकरी वाचवा देश वाचवा’ ‘पिक कर्ज माफ करा’ यासह इतर घोषणा देत शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले
Leave a comment