बीड । सुशील देशमुख
तब्बल बारा वर्षांनी कोजागिरी पौर्णिमेदिवशीच 28 व 29 ऑक्टोबरच्या रात्री भारतामध्ये खंडग्रास चंद्रग्रहणाचा योग जुळून आला आहे. या चंद्रग्रहणाचे वेध दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी लागणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 7:44 वाजेनंतर भोजन करणे अशुभ असेल. पहाटे 1 वाजून 5 मिनिटांनी हे खंडग्रास चंद्रग्रहण सुरु होईल. तर पहाटे 1 वाजून 44 मिनिटांना ग्रहण मध्यावर पोहोचेल. त्यानंतर पहाटे 2: 23 मिनिटांनी या ग्रहणाचा मोक्ष होणार आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. यंदा मात्र कोजागिरी पौर्णिमे दिवशीच खंडग्रास चंद्रग्रहण आल्याने घरोघरी प्रत्येकाने केवळ लक्ष्मी-इंद्र पूजन झाल्यानंतर दुधात चंद्राचे प्रतिबिंब दाखवल्यानंतर प्रसाद म्हणून केवळ ‘चमचाभर’ दूध प्राशन करावे. कारण अधिकचे दूध ग्रहण काळात टाळले पाहिजे ते दूषित झालेले असते अशी माहिती बीड येथील ज्योतिष विशारद तथा खगोल अभ्यासक सूर्यकांत मुळे गुरुजी यांनी ‘लोकप्रश्न’शी बोलताना दिली.
कोजागिरी पौर्णिमेला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. शास्त्रामध्ये लक्ष्मीचे पूजन कधीही स्वतंत्ररित्या होत नाही.लक्ष्मी-नारायण, लक्ष्मी-कुबेर आणि लक्ष्मी-इंद्र असे पूजन केले जाते. कोजागिरी पौर्णिमा अर्थात शरद पौर्णिमेदिवशी लक्ष्मी आणि इंद्राची पूजन करून चंद्राला दुग्ध शर्करेचा नैवेद्य अर्पण करून त्यानंतर दूध प्राशन केले जाते. मात्र यंदा तब्बल 12 वर्षांनी कोजागिरी पौर्णिमेदिवशी खंडग्रास चंद्रग्रहणाचा योग आला आहे. अशावेळी ग्रहणाचे नियम पाळले पाहिजेत. कोजागिरीदिवशी मोठ्या प्रमाणात दूध आटवून त्यात चंद्राचे प्रतिबिंब पाहू नये.
कोजागिरी पौर्णिमेदिवशी लक्ष्मीची प्रसन्नता व्हावी यासाठी दुग्ध शर्करेचा नैवेद्य अर्पण करून पूजा,भजन-कीर्तन करण्याची परंपरा आहे.परंतु हे खंडग्रास ग्रहण संपूर्ण भारतात दिसणार असून त्याचे वेध 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी लागणार आहेत. त्यानंतर सायंकाळी सात वाजून 35 मिनिटांनी प्रत्यक्ष ग्रहण कालास सुरुवात होईल. म्हणजेच या वेळेनंतर भोजन टाळावे.28 ऑक्टोबरला दुपारी ग्रहणाचे वेध लागत असले तरी 29 ऑक्टोबरच्या पहाटे 1 वाजून 5 मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहणाच्या स्पर्शास सुरुवात होणार असून 1 वाजून 44 मिनिटांनी हे ग्रहण मध्यावर पोहोचेल. नंतर पहाटे 2 वाजून 23 मिनिटांनी ग्रहणाचा मोक्ष होईल. गत बारा वर्षानंतर कोजागिरी पौर्णिमेदिवशी हे चंद्रग्रहण आले आहे. तसेच यापूर्वी आठ वर्षांपूर्वी कोजागिरी दिवशी खग्रास चंद्रग्रहण आले होते, ते छायाकल्प स्वरूपाचे होते.भारतातील काही प्रमुख ठिकाणी ते ग्रहण दिसले होते.
गर्भवती महिला, आजारी व्यक्ती अन् बालकांनी चंद्र प्रकाशापासून रहावे दूर
ग्रहण काळामध्ये विशेषत: गर्भवती महिला, अशक्त व्यक्ती, आजारी व्यक्ती, वृद्ध आणि बालकांची विशेष काळजी घ्यावी. महत्त्वाचे म्हणजे ग्रहण काळादरम्यान चंद्राचा प्रकाशही या सर्वांनी स्वतःच्या अंगावर घेऊ नये. ग्रहण काळात शक्यतो घरातच थांबावे. ग्रहण सुरु झाल्यानंतर आणि ग्रहण सुटल्यानंतर स्नान करावे अशी परंपरा आहे अशी माहिती बीड येथील ज्योतिष विशारद तथा खगोल अभ्यासक सूर्यकांत मुळे गुरुजी यांनी दिली.
Leave a comment