बीड जिल्हयातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करून तात्काळ अग्रीम रक्कम द्या - पंकजाताई मुंडे यांची मागणी
सलग २५ दिवस पाऊस नाही ; परळी तालुक्यात सर्वात कमी पाऊस तर जिल्हयात केवळ ४२ टक्केच पाऊस
बीड | वार्ताहर
जिल्हयात सलग २५ दिवस पाऊस झाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीपाची पीकं पूर्णपणे हातातून गेल्याने शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट आलं आहे. अशा संकटात त्यांना आधार देणं खूप आवश्यक आहे. विमा कंपनीने जिल्हयातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करून तात्काळ अग्रीम रक्कम द्यावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात सुरवातीपासूनच जिल्हयात अत्यल्प पाऊस झाला. पावसामुळे पेरण्या उशीरा झाल्या आणि नंतर पावसाने सलग २५ दिवस उघडीप दिली.२४ जूलै ते १८ ऑगस्ट दरम्यान जिल्हयात कुठेच पाऊस पडला नाही परिणामी खरीप पीकांची वाढ खुंटली. पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्हयात सरासरीच्या फक्त ४२ टक्के पाऊस झाला, सर्वात कमी २९ टक्के पाऊस परळी तालुक्यात नोंदला गेला. जिल्हयात एकूण खरीप पिके ऊस वगळता ७ लाख ६६ हजार ६८० हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या होत्या, पण पाऊसच नसल्याने सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, मूग, उडीद ही पीकं हातची गेली, यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.
विम्याची अग्रीम रक्कम द्या
पीक विमा कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एखाद्या भागात पावसाचा सलग २१ दिवस खंड असेल तर पीक विम्याची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना ॲडव्हान्स (अग्रीम) रक्कम देण्याची तरतूद आहे, पाऊस नसल्याने पीकं हातची गेली आहेत, त्यामुळे शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडला आहे, त्यांना आधार देण्याची आज खरी गरज आहे. विमा कंपनीने आता कशाचीही वाट न पाहता शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करावा आणि तात्काळ अग्रीम रक्कम वाटप करावी तसेच कृषी खात्याने विमा कंपनीला तसे आदेशित करावे अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.
Leave a comment