बीड मतदार संघातील जनतेचे क्षीरसागरांच्या भूमिकेकडे लक्ष
सुशील देशमुख
बीड जिल्ह्याचे राजकारण ज्यांचे नाव घेतल्याशिवाय पुर्ण होत नाही त्याच क्षीरसागर घराण्यातील जेष्ठ नेतृत्व आणि राज्याचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची कधी नव्हे ती राजकीय उपेक्षा गेल्या काही वर्षांत सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुर्लक्षित केल्यानंतर क्षीरसागर यांनी नवा राजकीय पर्याय शोधत उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांंधले, काही महिन्यांसाठी मंत्रीपद मिळवले. त्यानंतर मात्र विधानसभा निवडणूकीत पुतणे तथा राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्याकडून त्यांना पराभव स्विकारावा लागला. मात्र त्यानंतरही क्षीरसागर यांनी शिवसेनेत काम सुरु ठेवले. अलीकडे बीड नगर पालिकेच्या रस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यासाठी क्षीरसागरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले. तिथेच शिवसेना नेतृत्व दुखावले गेले अन् क्षीरसागरांना पक्षातून बाजूला करण्यात आले. तेव्हांपासून आजपर्यंत क्षीरसागर हे कोणत्याही राजकीय पक्षाशी थेट संपर्कात नाहीत, मात्र आता बदललेली राजकीय परिस्थिती पाहता त्यांनी तातडीने निर्णय घेणे गरजेचे झाले आहे. तशी चर्चाच बीड मतदार संघात क्षीरसागरांना समर्थन देणार्यांमध्ये होत आहे.
बीड जिल्ह्याच्या राजकारणातील अभ्यासू नेतृत्व म्हणून जयदत्त क्षीरसागर यांना जनता ओळखते. राजकारणात सक्रीय असतानाही विरोधकांशी कधीही कटूता न येवू देता संयत भूमिकेत राहून काम करणे ही क्षीरसागरांची शैली. इतर राजकीय पक्षांचे नेते त्यामुळेच ते विरोधक असले तरी क्षीरसागरांशी संपर्क ठेवून असतात. मागील पाच वर्षातील बीड जिल्ह्यातील राजकीय स्थित्यंतरे पाहिली तर माजी मंत्री क्षीरसागर हे थेट भूमिका घेताना जरी दिसत असले तरी राजकीयदृष्या ते थोडे कमकूवत होताना दिसत आहेत. निवडणूकात जय-पराभव होत असतोच. मात्र त्यानंतरही जनतेत सक्रीय होवून काम करत आपली कार्यशैली सिध्द करणारा नेता जनतेच्या मनात राहत असतो.काही वर्षांपूर्वीचा बीडचा राजकीय आलेख लक्षात घेतला तर जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मासलिडर नेते म्हणून पाहिले जात.
जेष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू आणि तत्कालीन मंत्री मंडळात अभ्यासू मंत्री अशी क्षीरसागरांची स्वतंत्र ओळख होती. नंतर बरेच राजकीय वारे वाहत राहिले, त्यात अनेक बदल घडत गेले, मात्र अशा स्थितीतही बीड मतदार संघावर क्षीरसागर यांची पकड आहे.क्षीरसागरांची जमेची आणखी एक बाजू म्हणजे केवळ मतदार संघापुरते मर्यादित न राहता त्यांना बीड जिल्ह्यातील इतर मतदार संघातही मानणारा वर्ग आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना विविध घटकांशी असलेले थेट संपर्क यामुळे क्षीरसागरांचे बहुआयामी नेतृत्व सिध्द झालेले आहे. असे असले तरी क्षीरसागर हे अपक्ष उमेदवार असल्याच्या स्थितीत सध्या दिसत आहेत. बहुधा त्यांनी इतके दिवस स्वत:हून कोणतीच भूमिका घेतलेली नाही.मात्र 2 जून रोजी राज्याच्या राजकारणात जो मोठा राजकीय भूंकप झाला आहे, त्याचे धक्के अनेक मतदार संघापर्यंत जाणवले आहेत. अशा स्थितीत क्षीरसागरांसारखा मंत्रीमंडळात कामाचा प्रदिर्घ अनुभव असलेला नेता अडगळीत का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे. राजकारण सतत प्रवाहित आणि बदलत जाणारे आहे.अशावेळी जयदत्त क्षीरसागरांनी तात्काळ भूमिका घेणे आवश्यक आहे. राजकारणात संधी मिळते, पण ती सतत मिळेलच याची शाश्वती आताच्या एकंदर स्थितीवरुन दिसते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेमध्ये पडलेली फुट आणि त्यातून निर्माण झालेले राजकारणाचे नवे समीकरण लक्षात घेता जयदत्त क्षीरसागर काय भूमिका घेणार याकडे मतदार संघातील जनतेेचे लक्ष आहे.
जयदत्त क्षीरसागरांना भुजबळांचा फोन
माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर आणि ओबीसीचे नेते तथा राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांचे संबंध अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. एकवेळ भुजबळ राष्ट्रवादीच्या बाहेर जाण्याच्या मनस्थितीत होते, तेव्हा जयदत्त क्षीरसागरांनी बीडमध्ये मेळावा घेत भूजबळांना राष्ट्रवादीच्या बाहेर जावू नका अशी विनवणी केली होती. जयदत्त क्षीरसागरांनी राष्ट्रवादी सोडली मात्र छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल या दोन नेत्यांशी जयदत्त क्षीरसागरांचे संबंध कायम राहिले. भेटीगाठीही होत राहिल्या. नंतर जयदत्त क्षीरसागरांनी आपला मार्ग बदलला.अशाही परिस्थितीत भुजबळांनी क्षीरसागरांना कायम मदत करण्याचे काम केले. आता पुन्हा जयदत्त क्षीरसागर कुठल्याही राजकीय पक्षात नाहीत. त्यामुळे नव्याने भाजपा सरकारमध्ये सामील झालेले आणि मंत्री झालेले छगन भुजबळ यांनी जयदत्त क्षीरसागरांना स्वत: फोन करून विद्यमान राजकारणाबद्दल विचारणा केली आणि या मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आमंत्रणही दिले अशी चर्चा होत आहे. आता जयदत्त क्षीरसागर यावर काय निर्णय घेतात? याकडे लक्ष लागले आहे.
Leave a comment