होमपिच स्ट्राँग असणेच महत्वाचे
बीड । वार्ताहर
गेल्या विधानसभा निवडणूकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर अन्याय केल्याची भावना समर्थकांमधून सातत्याने व्यक्त केली जात आहे. संघर्ष आणि राजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे हे 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत केवळ साडेचार वर्ष सत्तेत होते. त्यानंतर ते कायम विरोधी बाकावरच होते, तरीही राज्यात आणि देशात आणि त्याचबरोबर जिल्ह्यात त्यांचा राजकीय दबदबा कायम होता. पंकजाताईंना खर्या अर्थाने स्व.गोपीनाथ मुंडेंचा वारसा राजकारणात टिकवायचा असेल तर मुंडेंनी जे केले, तेच पंकजाताईंना करावे लागणार आहे.अगोदर होमपिच स्ट्राँग करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात विरोध झाला नाही तर राज्यात आणि पक्षात विरोध होत नाही हे राजकारणाचे गणित आता पंकजाताईंना सोडवावे लागणार आहे. त्यामुळे वरळीतील गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे कार्यालय पुन्हा परळीत आणून परळी मतदार संघ एकसंघ करण्यासाठी तन,मन,धनाने काम करावे लागणार आहे. पक्ष वेळ आल्यावर न्याय देतच असतो, ती वेळ आणणे आपल्या हातात आहे, हे महत्वाचे राजकीय गमक पंकजाताईंनी लक्षात घेणे गरजेचे होवून बसले आहे.
केंद्रीय मंत्रीमंडळाचा बुधवारी विस्तार झाला. त्यामध्ये जिल्ह्याच्या खासदार प्रितम मुंडे यांना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली गेली होती, आणि ते मिळायलाही हवे होते, ज्यामुळे पक्षाला जिल्ह्यात तरी निदान फायदा झाला असता; परंतु काम करण्यासाठी केवळ मंत्रीपदच असायला हवे, असेही नाही. स्व.गोपीनाथ मुंडेंकडे कधीही कायम मंत्रीपद नव्हते, मात्र त्यांनी जिल्ह्याचे अनेक प्रश्न विरोधात बसून मार्गी लावले. पंकजा मुंडे व प्रितम मुंडे या नव्या पिढीच्या राजकीय वारसदार आहेत. अलीकडे राजकारणाची परिभाषा पूर्णपणे बदलून गेली आहे. केवळ विकासकामे केली म्हणजे मतदानाची आकडेवारी वाढते, हे देखील समीकरण चूकीचे आहे. मतदार संघाचा आणि जिल्ह्याचा विकास, संघटन, जनसंपर्क, लोकाभिमूख कामे आणि राजकीय प्रतिमेची बांधणी केली तरच राजकारण यश मिळते आहे. स्व.गोपीनाथ मुंडेंच्या वाट्याला देखील संघर्ष आला. त्यांनी तर उभी हयात पक्षात घातली होती. पंकजा मुंडेंचे राजकीय वय केवळ 15 वर्ष आहे. अजून त्यांना खूप मोठी संधी आहे. पक्षामधून त्यांना डावलले का जाते, याचा विचारही त्यांनी करणे गरजेचे आहे. पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यानंतर पक्षातील एक मासलिडर म्हणून त्यांना पक्ष सत्तेच्या परिघाबाहेर ठेवणार नाही अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना होती, मात्र पक्षाने त्यांचे समर्थक असलेल्या राजेश कराड यांना विधानपरिषद व डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेवर घेतले. त्यांनतर आता कराड यांना केंद्रात मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. यामुळे पंकजा मुंडेंचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सुरु झाली आहे. परंतु हे महत्व कोण कमी करत आहे? आणि ते का केले जात असावे? याचीही चर्चा होणे गरजेचे आहे. किंवा त्या संदर्भात मुंडे भगिणींनीच विचार करणे गरजेचे आहे. पंकजा मुंडे यांच्यामुळे जर पक्षाचे काही आमदार निवडून येत असतील आणि पक्ष नेतृत्वाला मान्य असेल तर पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर अशी वेळ येवू द्यायलाच नको होती. पक्षीय राजकारणामध्ये पंख छाटण्याचे काम तर सातत्यानेच सुरु असते. आपल्यापेक्षा मोठा कोण? असा प्रश्न पक्षातील मोठे नेते कायम स्वत:ला विचारत असतात. त्यावेळी उत्तर स्वत:ला अपेक्षित असावे असे प्रत्येकालाच असते, आणि त्यातूनच असे राजकीय पंख छाटण्याचे काम केले जाते.
पंकजा मुंडे परळीतून पराभूत झाल्यानंतर त्याचा त्यांच्या राजकीय ताकदीवर किती परिणाम झाला याहीपेक्षा त्यांच्या पराभवामुळे पक्षाचे काही नुकसान झाले का? असा विचार पक्षातील नेत्यांना करण्याची वेळ यायला हवी आणि ती आणणे पंकजा मुंडेंच्या हातात आहे. त्यासाठी केवळ सोशल मीडियावर व्यक्त होवून, भावनिक होवून जमणार नाही. त्यासाठी जनतेच्या दरबारात जावून जनता आपल्या बरोबर आहे हे चित्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. केवळ ओबीसी नेतृत्व म्हणून पंकजा मुंडेंना नेता म्हणणे चूकीचे ठरेल. पक्षाकडून त्यांना ओबीसीचा नेता म्हणून पुढे आणले जात आहे. परंतु जिल्ह्यात राजकीय दबदबा निर्माण करायचा असेल आणि त्याच माध्यमातून राज्याच्या राजकारणावर पकड मिळवायची असेल तर सर्व जाती-धर्मांना बरोबर घेवून जाणे गरजेचे आहे. काहीही प्रसंग आला तर पंकजा मुंडेंची तुलना स्व.गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणाशी केली जाते.मूळातच गोपीनाथ मुंडे हे वसंतराव भागवतांसारख्या प्रतिभावान राजकारण्याच्या तालमीत घडले होते. प्रमोद महाजनांसारखा वजनदार नेत्याचा वरदहस्त त्यांच्या पाठीशी होता. एवढे असूनही त्यांना अडगळीत टाकण्याचा प्रयत्न त्या काळातही झाला होता. केवळ भाजपामध्येच असे होते, असेही नाही. काँग्रेसमध्ये स्व.विलासराव देशमुखांनाही अडगळीत टाकले होते. पश्चिम महाराष्ट्रात मोठे प्रस्थ असलेल्या विखे पाटलांनाही याची प्रचिती आली होती. विदर्भात विदर्भवीर म्हणून ओळखल्या गेलेल्या जाबंवत धोटे यांना देखील बाजूला ठेवले गेले होते. परंतु त्यांचे राजकीय वजन पक्षातील नेत्यांना कमी करता आले नाही. ते जनतेत राहिले, त्यामुळे त्यांचे वजन वाढतच राहिले.
पंकजा मुंडेंना आगामी काळात राजकीय सारीपाटावर सोंगट्या खेळताना या सर्वांचा विचार करावा लागणार आहे. आज जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे म्हणजे भाजप असे चित्र आहे. त्यामुळे त्यांना जिल्ह्यातच पक्ष आणि स्वत:चे राजकीय संघटन मजबूत करणे गरजेचे होवून बसले आहे. राजकारणात उपद्रव क्षमतेलाही महत्व असते. ती उपद्रवक्षमता दाखवण्याची धमक पंकजा मुंडेंमध्ये असतानादेखील त्यांनी ती दाखवली नाही. त्याचाही फटका त्यांना बसलाच असावा. केवळ परळी मतदार संघांपुरता विचार करुन त्यांना जमणार नाही. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यांना भविष्याचा राजकीय वेध घेताना नव्याने बांधणी करावीच लागणार आहे. जिल्हा त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे त्यांनी वरळी सोडून परळी जोडणे आवश्यक होवून बसले आहे. एक वर्षानंतर पुन्हा लोकसभेचे वारे वाहतील, त्यावेळी गेल्या पाच वर्षात काय केले? हे सांगण्यासाठी जवळ काहीतरी असावे लागणार आहे. त्याची तयारीदेखील पंकजा व प्रितम मुंडेंना करावी लागणार आहे. लढावू बाण्याने राजकारण केले तर लढाई नक्कीच जिंकली जाते. परळीत काय चूका झाल्या, कोण चुकले, याचे गणित पंकजांना आधि मांडावे लागणार आहे, पण त्यासाठी आधी परळीत येवून बसावे लागणार आहे. होमपिच स्ट्राँग झाले तर पुन्हा आता जशी वेळ आली आहे तशी वेळ येणार नाही. पक्ष नेतृत्वालादेखील राजकीय वजन असलेल्या नेत्यांचा विचार करावा लागतो. पंकजा मुंडे तर राज्याच्या नेत्या आहेत परंतु फक्त आणि फक्त स्वत:चा मतदारसंघ त्यांना राखता न आल्याने त्यांच्या संदर्भात अशी डावलण्याची चर्चा होवू लागली आहे. भविष्यात पक्ष त्यांना वेळ आल्यावर संधी देणारच आहे, परंतु संधी निर्माण करण्यासाठी पंकजा मुंडे व प्रितम मुंडेंनाही प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे.
Leave a comment