जिल्हा रुग्णालयाच्या निष्क्रिय कारभारामुळे निष्पाप माणसं मरत आहेत
बीडमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे जिल्हाधिकर्यांना निवेदन
बीड । वार्ताहर
सध्या आरोग्य प्रशासनाचे सर्व लक्ष ऑक्सीजन व रेमडेसिविर इंजेक्शनच्या उपलब्धतेवर केंद्रित झालेले आहे. परंतु या सर्व घडामोडींमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन्स नसताना त्याचा पर्याय म्हणून वापरण्यात येणार्या फॅबी फ्लू गोळ्यांसह रुग्णांना वापरण्यात येणारे इतर अँटिबायोटिक्स इंजेक्शन्ससह महत्वाची औषधे हे देखील पुरेशा प्रमाणात जिल्हा रुग्णालयात व कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध नाहीत ही फार गंभीर बाब आहे.जिल्हा रुग्णालयात फिजिशियन डॉक्टर्सची संख्या वाढवणे अत्यंत आवश्यक आहे, नसता रुग्णांचे नाहक बळी जातील. या सर्व बाबींवर आपले नियंत्रण न राहिल्यास येणार्या महिनाभरात रुग्णांचे मृत्यू मोठ्या प्रमाणात होतील आणि यास जिल्हा आरोग्य प्रशासन जबाबदार असेल असा इशारा फारुख पटेल व अमर नाईकवाडे यांच्यासह सर्वपक्षीय शिष्टमंडळाने रविवारी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची भेट देवून दिले.
निवेदनात म्हटले आहे की, रुग्णाला वेळेवर औषध-गोळ्या न मिळाल्यामुळे एचआरसीटी स्कोरचे प्रमाण कैक पटीने वाढत आहे. याचा परिणाम म्हणून रुग्ण गंभीर होऊन जीवाशी जात आहेत. यासोबतच जिल्हा रुग्णालयात रुग्णांना दिले जाणारे रेमडेसिवीर इंजेक्शन्स यंत्रणेच्या चुकांमुळे सर्वांना मिळत नाहीत. रेमडेसिवीर इंजेक्शन्स रुग्णांना देण्यासाठी जी यादी बनवली जाते ती अतिशय निष्काळजीपणे बनवून बर्याच रुग्णांची नावे त्यातून वगळली गेल्याचे निदर्शनास येत आहे. अशाच प्रकारे एचआरसीटी स्कोर 21 असणर्या दोन रुग्णांची नावे सदरील यादीतून वगळली गेल्यामुळे त्या गंभीर रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात आले नसल्याचे आम्ही स्वतः जिल्हा शल्यचिकित्सकांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. यासोबतच अतिदक्षता विभाग नावाचा प्रकार जिल्हा रुग्णालयांमध्ये राहिलेला नाही. प्रत्येक वॉर्ड मध्ये बायपॅप व व्हेंटिलेटर वरील रुग्ण आढळून येत आहेत. बायपॅप व व्हेंटिलेटर वरील सर्व गंभीर रुग्ण एका वॉर्डमध्ये एकत्र ठेवून त्यांच्यावर उपचार करणे जिल्हा रुग्णालयांमधील कार्यरत असलेल्या फिजिशियन डॉक्टरांना अधिक सोपे जाईल, असे आम्ही वारंवार सांगूनही जिल्हा शल्यचिकित्सकांनी यावर काहीही कार्यवाही केलेली नाही. जिल्हा रुग्णालयाची एवढी दयनीय अवस्था असतानाही प्रत्येक वॉर्डसाठी स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी अद्यापही नेमण्यात आलेला नाही. एका वैद्यकीय अधिकार्याकडे तीन-तीन वॉर्डची जबाबदारी देण्यात आलेली आहे. जिल्हा रुग्णालयांमध्ये फिजिशियनचा राऊंड हा रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्हायला हवा परंतु हा राऊंड फक्त बेड रिकामे करण्यासाठी असतो, तसेच रुग्ण पूर्ण बरा होण्याआधीच त्याला डिस्चार्ज दिला जातो. तसेच लसीकरणाची मोहीम अधिक प्रभावी करायची असल्यास आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे किंवा प्रत्येक वॉर्ड वाईज त्या-त्या भागातील शाळेच्या इमारती मधून लसीकरण कॅम्पचे आयोजन करावे. जेणेकरून सोशल डिस्टन्स राखला जाईल व नागरिकांची गैरसोय होणार नाही. वरील सर्व बाबींचा आपल्या स्तरावरून गांभीर्याने विचार व्हावा व सकारात्मक पावले उचलली जावीत असे गटनेते फारुख पटेल व नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी जिल्हादिखार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Leave a comment