रेमडेसिवर नियंत्रण कक्ष नावालाच

बीड । वार्ताहर

खासगी रुग्णालयवाले कोरोनाबाधीत रुग्णांच्या उपचारासाठी लाखो रुपये बील आकारात असले तरी रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना थेट जिल्हा रुग्णालयात पाठवत आहेत. वास्तविक संबंधित खासगी रुग्णालय प्रशासनानेच रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे हा नियम आहे; मात्र बीड शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणाहून खासगी रुग्णालये रुग्ण नातेवाईकांना जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देऊ लागले आहेत, यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. बुधवारी (दि.14) बीडमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांची भेट घेत साहेब काही करा पण एक तरी रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवून द्या’ अशी विनवणी केली. त्यानंतर डॉ. गित्ते यांनी जिल्ह्यातील रेमडेसिवीरच्या एकूण उपलब्ध साठ्याची माहिती औषध प्रशासन अधिकार्‍याकडून जाणून घेत संबंधितांना सूचना केल्या.

जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. वाढत्या समोर संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता कडक निर्बंध लागू केले आहेत. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक असलेल्या रेमडेसिवर इंजेक्शनचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची फरफट थांबावी यासाठी रेमडेसिविर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार सोमवारी (दि.12) जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी कक्ष स्थापन केला. मात्र रुग्णांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार या कक्षाच्या क्रमांकावर फोन केल्यानंतर ’इंजेक्शन उपलब्ध नाही, काही वेळ थांबावे लागेल’ असे सांगून अधिकची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना एक इंजेक्शन मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी फिरावे लागत आहे.बुधवारी दुपारी काही नातेवाईक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गिते यांना भेटले. खासगी रुग्णालय प्रशासनाकडून ’इंजेक्शन उपलब्ध नाही, तुम्ही बाहेर जाऊन इंजेक्शन घेऊन या’ असे सांगत आहेत, परंतु इंजेक्शन कुठेही मिळत नाही त्यामुळे तुम्हीच आम्हाला आता इंजेक्शन उपलब्ध करून द्या अशी विनवणी नातेवाईकांनी डॉ.गित्ते यांच्याकडे केली. डॉक्टर गीते यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत संबंधित यंत्रणेला फोनाफोनी करत इंजेक्शनच्या साठ्याबाबतची माहिती जाणून घेतली; मात्र दुपारपर्यंत अनेकांना इंजेक्शन मिळाले नव्हते. कोरोनाच्या संकट काळात चढ्या भावाने विक्री करण्यासाठी इंजेक्शनची साठेबाजी केली जात आहे याचा तपास करणे आवश्यक आहे अशा भावनाही व्यक्त केल्या गेल्या.

रेमडेसिवरच्या साठ्याची माहिती मिळेना

रेमडेसिवर इंजेक्शनचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाल्याने नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश शासनाने दिले. बीडमध्ये हा कक्षही स्थापन झाला. यासाठी सहा अधिकार्‍यांची नियुक्ती केली असून ते इंजेक्शन बाबतच्या अडचणी दूर करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, मात्र प्रत्यक्षात वेगळेच चित्र दिसत आहे. शिवाय दररोज जिल्ह्यात रेमडेसिवरचा किती साठा उपलब्ध आहे याची माहिती वर्तमानपत्रातून प्रकाशित केली जाईल असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले होते, पण ही माहिती देण्यास औषध निरीक्षक टाळाटाळ करत आहेत, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना औषधी दुकाने पायदळी तुडवत फिरावे लागते आहे.

जिल्हा प्रशासन नियम कठोर करणार का?

सध्या कोरोना संकटकालीन स्थितीत आरोग्य प्रशासन बाधित रुग्णांवर उपचार करण्यात व्यस्त असताना दुसरीकडे काही प्रवृत्ती मात्र महत्त्वाच्या इंजेक्शनची साठेबाजी करून आपली दुकानदारी जोरात चालवत आहेत. जिल्हा प्रशासनाने रुग्ण उपचारात कोणतीही तडजोड न स्वीकारता पाहिजे ते औषधी आणि इंजेक्शन संबंधिताला वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी साठेबाजीचा प्रयत्न करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.