ट्रामा केअरची इमारत धूळ खात पडून
जुन्या ग्रामीण रुग्णालयातच कोव्हीड सेंटरचा अट्टाहास का?
बीड । विशेष प्रतिनिधी
कोरोना संसर्गामध्ये गेल्या वर्षापूर्वी आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून त्यांचे मृत्यूही झाले होते. आष्टीला लागूनच नगर जिल्हा असल्याने येथील ग्रामीण रुग्णालयातून नगरला रुग्ण पाठवण्याचा सपाटा त्यावेळी सुरु होता;मात्र आता उपचार खर्चिक झाले. नगरमधील मोठ्या रुग्णालयांनी पॅकेज सिस्टिम आणली,त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना हे उपचार परवडणारे नाहीत. आष्टीमध्ये गेल्या काही दिवसांपासून दुसर्या लाटेत रुग्णसंख्या वाढू लागली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन आष्टीमध्ये ट्रामा केअरची इमारत उभारली गेली आहे. खरे तर कोव्हीड सेंटर त्याचठिकाणी उभे करायला हवे होते, परंतु तेथे मोठ्या प्रमाणात रुग्ण ठेवता येतील आणि आरोग्य प्रशासनावरील ताण वाढेल म्हणून जुन्या जिर्ण झालेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच कोव्हीड सेंटर ठेवण्याचा अट्टाहास वैद्यकीय अधिक्षक डॉ.राहूल टेकाडे यांनी केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकप्रश्नच्या प्रतिनिधीने दोन्हीही इमारतींची पाहणी करुन नागरिकांशी चर्चाही केली. आष्टीमधील बहुतांश रुग्णांच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी ट्रामा केअरमध्येच कोव्हीड सेंटर सुरु करण्याची मागणी केली आहे.
आष्टी तालुक्यातील कोविड रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे ही इमारत जीर्ण आणि आयुष्य संपलेली असूनही या ठिकाणी रुग्णांना ठेवण्यात आलेले आहे. ट्रामा केअर सेंटरमध्ये पंधरा ते वीस रूम अत्याधुनिक व अत्याधुनिक सोयींनी युक्त असून शंभर रुग्णांसाठी बेडवर ऑक्सिजनची सुविधा मिळण्यासाठी पाईपलाईन पाच व्हेंटिलेटर अशी सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे; परंतु हे सर्व धुळ खात पडलेले आहे याचा वापर होत नाही केंद्र शासनाने कोव्हीडसाठी दिलेल्या निधीतून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आलेला आहे परंतु या सुविधा सर्वसामान्य रुग्णांना मिळत नसल्याने याचा रुग्ण सेवेच्या उद्देशाला हरताळ नसल्याचे दिसून येत आहे. अत्यंत अल्प खर्चामध्ये केवळ पार्टिशन केले तरी एकाच ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचा कारभार आणि त्याच ठिकाणी कोव्हीड सेंटर चालू शकेल या ठिकाणी सहा ते सात रूम या कोरोना वॉरियर्ससाठी म्हणजे आरोग्य कर्मचारी पोलीस कर्मचारी आणि पत्रकार यांना तात्काळ आणि चांगल्या सुविधा मिळण्यासाठी राखीव ठेवता येतील आणि उर्वरित जागी 100 रूग्णांवर कोरोनाचे उपचार करता येतील. याठिकाणी वरच्या मजल्यावर रुग्णांना मोकळ्या हवेत फिरता येऊ शकेल. या ठिकाणी शासकीय सुविधा असूनही सध्याच्या कोवाड सेंटरमधील अवस्था पाहून रुग्णांना खासगी रुग्णालयाकडे जावे लागत आहे तर काही रुग्ण अहमदनगरला जात आहेत. यामध्ये त्यांना लाखो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतो आहे याचा कोणालाही खेद नाही आणि खंतही नाही लोकप्रतिनिधी इकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे या ठिकाणी कर्मचारी आणि रुग्ण कोणाकडे तक्रार करू शकत नाहीत असे चित्र आहे.
एकाच इमारतीमध्ये विलगीकरण करून कॉल सेंटर आणि ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्यास वैद्यकीय अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकारी यांना एकाच जागेवरून सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येईल त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होऊन रुग्णांना आणि नातेवाईकांना चांगले उपचार सेवा देता येईल. लवकरच या ठिकाणी 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय या याला मंजुरी मिळणार आहे अशी अत्याधुनिक सुविधा असताना रुग्णांना नातेवाईकांना आणि कर्मचार्यांना होणारा त्रास थांबेल का असा प्रश्न निर्माण होत आहे. महामारीमध्ये आष्टी मध्ये मृत्यूची संख्या कमी असली तरी दादासाहेब बन या पत्रकाराला जीव गमवावा लागला आहे. या ठिकाणी वेळेवर ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर या सुविधा मिळाल्या असत्या तर वेळेत उपचार होऊन त्यांचा जीव वाचला असता आणि अहमदनगरला खासगी रुग्णालयात जाण्याची वेळ आली नसती हेही तेवढेच खरे. यावर विचार होईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हाधिकारी साहेब लक्ष घाला
आष्टी येथील परिस्थिती पाहता ट्रामा केअरमध्ये कोव्हीड सेंटर सुरु करणे रुग्णांच्या आणि आरोग्य प्रशासनाच्या सोयीचे आहे. केवळ ताण वाढेल म्हणून रुग्णांची गैरसोय करायची असेल तर हे योग्य नाही. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी स्वत: आष्टीत येवून परिस्थिती पहावी, आणि या संदर्भात रुग्णसेवेचा निर्णय घ्यावा अशीही मागणी आष्टीकरांनी केली आहे.
आ.सुरेश धस पुढाकार घेणार का?
जनतेच्या प्रश्नावर सातत्याने रस्त्यावर उतरणारे आणि प्रशासनाला निर्णय घ्यायला भाग पाडणार्या आ.सुरेश धस यांनी देखील या प्रकरणात पुढाकार घ्यायला हवा. कारण हा रुग्णांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. गोर गरिबांना नगरला उपचाराला पाठवणे कितपत योग्य आहे? त्यामुळे आ.धस यांनी याप्रश्नी पुढाकार घेवून जनतेची सोय करावी अशी मागणी होत आहे.
Leave a comment