जालना । वार्ताहर
शिक्षण मिळणे हा प्रत्येक बालकाचा अधिकार असुन जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमावर आधारित गुणवत्तापुर्ण व दर्जेदार शिक्षणाबरोबरच जीवनामध्ये उपयोगी पडणारे ज्ञान देण्याचे कार्यही शिक्षकांनी करावे, असे प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांनी केले. येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकार्यांना मार्गदर्शन करताना श्रीमती. गायकवाड बोलत होत्या.
यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार विक्रम काळे, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, जिल्हा परिषदेचे सभापती सर्वश्री कल्याण सपाटे, जयप्रकाश चव्हाण, विष्णुपंत गायकवाड, श्री परशुवाले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, राजाभाऊ देशमुख, राम सावंत राजेंद्र राख, शिक्षणाधिकारी (प्रा) कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी (मा) श्रीमती आशा गरुड आदींची उपस्थिती होती. शालेय शिक्षण मंत्री श्रीमती गायकवाड म्हणाल्या, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना नाविन्यपुर्ण व कल्पकपणे शिक्षण दिले जात असून या शिक्षणाचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांना कसा होईल याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. शिक्षणाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करण्याच्या सुचना देत जालना जिल्ह्यात असलेल्या जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या शाळांमध्ये ज्या ठिकाणी शौचालये नाहीत अथवा मोडकळीस आलेली आहेत अशांच्या उभारणीसाठी आवश्यक असणार्या निधीसाठी मंत्रालयीन स्तरावर आपण व्यक्तीश: प्रयत्न करणार असल्याचे सांगत जिल्हा नियोजन विकास मंडळातुनही यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत पालकमंत्र्यांना विनंती केली. तसेच कोरोनामुळे राज्यात संगणक, मोबाईल, दुरचित्रवाहिन्यावरुन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची सोय करण्यात आली असुन स्थानिक केबलच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबाबत अधिकार्यांनी प्रयत्न करावेत. शिक्षकांच्या असलेल्या प्रश्नाबाबतही प्रशासनाने गतिमानतेने काम करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकार्यांना केल्या. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री टोपे म्हणाले,
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या इमारतींची अवस्था अत्यंत वाईट आहे. या शाळाखोल्यांची दुरुस्ती तसेच नवीन बांधकामासाठी सर्वांनी एकत्रितरित्या निधीसाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे. आजची बालके हे उद्याच्या देशाचे भविष्य आहेत. बालवयातच विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळुन एक जबाबदार नागरिक निर्माण होण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार करावेत. गुणवत्तापुर्ण शिक्षणाबरोबरच सदृढ व निरोगी शरीर राहण्यासाठी पौष्टीक आहाराबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये मैदानी खेळाची गोडी निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगत आजच्या आधुनिक युगामध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. हे तंत्रज्ञान प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी शिक्षण विभागाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या विविध पुस्तिकांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रातील अडचणी शालेय शिक्षण मंत्र्यासमोर विषद केल्या. बैठकीस शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Leave a comment